कुटुंब दुबईत, चार चोरांच्या टोळीने बंगला फोडला, ८५ हजारांच्या रोख रकमेसह दागिने केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:58 IST2025-12-06T19:58:28+5:302025-12-06T19:58:53+5:30
‘एन-१२’मध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या बहिणीच्या घरी चोरी

कुटुंब दुबईत, चार चोरांच्या टोळीने बंगला फोडला, ८५ हजारांच्या रोख रकमेसह दागिने केले लंपास
छत्रपती संभाजीनगर : दुबईत मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या कुटुंंबाचे घर फोडून चार चोरांच्या टोळीने ८५ हजार रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दि. ४ रोजी दुपारी ३ वाजता एन-१२ मधील सेक्टर ५ मध्ये ही चोरी उघडकीस आली.
मिन्हाज अहेमद खान अशफाक अहेमद खान व सीमा मिन्हाज खान यांचा मुलगा दुबईत वास्तव्यास असतो. ४ ऑक्टोबर रोजी ते घराला कुलूप लावून दुबईला मुख्य चावी सोबत घेऊन गेले. यादरम्यान कंपाउंडच्या स्वच्छतेसाठी एक महिला नियुक्त केली होती. ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्वच्छता कर्मचारी महिला गेली असता तिला कंपाउंडसह घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. शेजाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी मिन्हाज व सीमा यांना कळवले. त्यानंतर त्यांचा भाचा अखिल मजीद यार खान (३६, रा. जुबलीपार्क) यांनी धाव घेतली. त्यांनी आत जाऊन पाहिले असता सर्व बेडरूमचे कुलूप तोडलेले होते. सामान अस्ताव्यस्त फेकले होते. मिन्हाज यांना व्हिडीओ कॉल करून हा प्रकार दाखवण्यता आला.
घटनेची माहिती कळताच सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरांनी कपाटातील ८५ हजार रुपये रोख, २ ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या, २ ग्रॅमची सोनसाखळी, १६० ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे व एक मोबाइल लंपास केला. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या बहिणीचे हे घर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अखिल यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
अंगावर शाल, स्वेटर, कानटोपीसह
दरम्यान, बंगल्यासमोरून सतत वाहनांची ये-जा सुरू होती. शिवाय, आसपासच्या बंगल्यांना सुरक्षारक्षक आहे. त्यामुळे अंगावर शाल, स्वेटर, कानटोपी परिधान केलेल्या चौघांपैकी आधी दोन चोरांनी बंगल्यात प्रवेश केला. तेव्हा अन्य दोघे समोरील कारच्या आडोशाला लपले. येणारी वाहने किंवा माणसांची चाहूल लागताच ते आत त्यांना इशारे करून सांगत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले.