खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले प्रेमीयुगूलाचे मृतदेह
By सुमित डोळे | Updated: September 7, 2023 19:31 IST2023-09-07T19:30:05+5:302023-09-07T19:31:19+5:30
वेदांतनगर पोलिस पुढील तपास करत आहेत

खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले प्रेमीयुगूलाचे मृतदेह
छत्रपती संभाजीनगर : शहरातील कर्णपूरा परिसरातील हॉटेल पंचवटीत प्रेमीयुगूलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरूवारी दुपारी हॉटेल प्रशासनाला खोलीतून प्रतिसाद येणे बंद झाल्याने संशय आल्यानंतर ही घटना समोर आली. ऋषिकेश सुरेश राऊत (२६) आणि दिपाली अशोक मरकड (१८) असे मृत तरुण, तरुणीचे नाव आहे.
ऋषीकेश मुळ बीडकिन गावचा रहिवासी होता. गावातच त्याचा छोटा व्यवसाय असून वडील शासकीय सेवेत क्लर्क आहेत. दोन, भाऊ, आई वडिलांसह तो गावाच्या सोनार गल्लीत राहतो. तर मुळ ढाकेफळची असलेली दिपाली काही महिन्यांपासून बीडकीन येथे मामाकडे राहत होती. मात्र, दोन दिवसांपासून दोघेही एकाच वेळी अचानक बेपत्ता झाले होते. बुधवारी त्यांनी हॉटेल पंचवटी मध्ये ३०५ क्रमांकाची खोली बुक केली होती. गुरूवारी सकाळी मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नसल्याने वेटरने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून पाहिल्यावर दोघेही मृत लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती कळताच वेदांतनगरचे निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली.
आत्महत्या की घातपात
ऋषीकेश व दिपाली दोघेही हॉटेल पंचवटीच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर कळेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. हॉटेलमध्ये नेमके कधी आले, नोंदणी, कागदपत्रांची नोंद केली का, याविषयी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.