दुचाकीच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू; नुकसानभरपाईच्या दाव्यात ९१ लाख रुपयांत तडजोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:08 IST2025-10-03T19:07:44+5:302025-10-03T19:08:01+5:30
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ९१ लाख रुपयांत तडजोड करून प्रकरण संपविले

दुचाकीच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू; नुकसानभरपाईच्या दाव्यात ९१ लाख रुपयांत तडजोड
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीने धडक दिल्यामुळे मरण पावलेले माजी सैनिक राजेंद्र किसन लाड (५२) यांच्या वारसांनी दाखल केलेल्या नुकसान भरपाईच्या दाव्यात विमा कंपनी आणि पक्षकार यांनी सदरील प्रकरण संपविण्याचा निर्णय घेऊन नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ९१ लाख रुपयांत तडजोड करून प्रकरण संपविले. पक्षकारांच्या वकील ॲड. मीरा. एम. परदेशी व मंगेश सरोदे तसेच विमा कंपनीचे वकील यांच्या सल्ल्यानुसार भविष्याचा विचार करून उभय पक्षाने प्रकरण मिटविले.
काय होती घटना?
दाखल दाव्यानुसार माजी सैनिक राजेंद्र किसन लाड (५२, रा. पडेगाव) हे १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ९.४५ वाजे दरम्यान जेवण करून घरापासून वाणी मैदान , जयभीम चौकाकडे वाॅकिंगसाठी जात असताना दुचाकीने (एमएच २० एफएन ५२७१) च्या चालकाने राजेंद्र यांना धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना दोन दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
नुकसानभरपाईचा दावा व तडजोड
राजेंद्र यांच्या पश्चात त्यांची पत्नी शैला आणि ऋषल व कृष्णल ही मुले आहेत. त्यांनी दुचाकी चालक-मालक व विमा कंपनी यांच्याविरुद्ध येथील मोटार अपघात न्यायाधीकरणात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. राजेंद्र लाड हे माळीवाडा येथे पशुसंवर्धन विभागात कार्यरत होते. त्यांच्यावर पत्नी आणि दोन मुले अवलंबून होती. त्यांचे मासिक वेतन किती होते, त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबाचे भविष्यातील झालेले आर्थिक नुकसान आदी बाबी ॲड. परदेशी यांनी न्यायाधीकरणात मांडल्या होत्या. दावा साक्षीपुराव्यासाठी सुनावणीस येणार होता. दरम्यान, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये उभयपक्षाच्या संमतीने वरीलप्रमाणे तडजोडीने प्रकरण संपुष्टात आले.