वक्फ बोर्डाच्या पत्रानंतर जुना मोंढ्यातील दर्ग्यासमोरील अतिक्रमण जमीनदोस्त; मनपाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:27 IST2025-06-18T19:26:34+5:302025-06-18T19:27:24+5:30

वक्फ बोर्डाच्या पत्रानंतर महापालिकेची कारवाई; जुना मोंढा भागातील हजरत कादर औलिया दर्गा परिसरातील अतिक्रमण मनपाने काढले.

Encroachment in front of the kadar Auliya Dargah in Juna Mondhya demolished after letter from Waqf Board; Municipal Corporation takes action | वक्फ बोर्डाच्या पत्रानंतर जुना मोंढ्यातील दर्ग्यासमोरील अतिक्रमण जमीनदोस्त; मनपाची कारवाई

वक्फ बोर्डाच्या पत्रानंतर जुना मोंढ्यातील दर्ग्यासमोरील अतिक्रमण जमीनदोस्त; मनपाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : जुना मोंढा भागातील जाफरगेट परिसरात हजरत कादर औलिया यांच्या दर्गा परिसरात काहीजणांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढावे, अशी मागणी वक्फ बोर्डाने मनपाकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी पोलिस बंदोबस्तात मनपाने पत्र्याचे शेड टाकलेले अतिक्रमण जमीनदोस्त करून जागा मोकळी केली.

दर्गाहच्या परिसरात मोठे कब्रस्तानही आहे. दफनविधीसाठी आलेल्या नागरिकांना अतिक्रमणांचा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नव्हती. दोन महिला व एका नागरिकाने नवीन पत्रे आणून शेड मारले होते. वक्फ बोर्डाने मनपा प्रशासकांना दि. ४ जून रोजी अतिक्रमण काढावे, अशी विनंती केली होती.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना पुढील कारवाईचे आदेश दिले होते. वॉर्ड अधिकारी रमेश मोरे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशीद यांनी दि. ६ जून रोजी पाहणी करून अहवाल सादर केला होता. अतिक्रमण करणाऱ्यांना तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस दिली होती. खुलासा समाधानकारक नसल्याने मंगळवारी कारवाई करण्यात आली. ज्या ठिकाणी अतिक्रमण होते, त्या ठिकाणी मनपाची वाहने सुद्धा जात नव्हती. संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले. ही कारवाई निरीक्षक सय्यद जमशीद, मजहर अली, सागर श्रेष्ठ, रवींद्र देसाई यांनी केली.

Web Title: Encroachment in front of the kadar Auliya Dargah in Juna Mondhya demolished after letter from Waqf Board; Municipal Corporation takes action