दहा लाखांच्या खंडणीसाठी शेतजमिनीवर अतिक्रमण, ११ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 12:32 IST2021-07-16T12:31:12+5:302021-07-16T12:32:52+5:30
Encroachment on agricultural land for ransom : चार महिन्यांनंतरही आरोपी ऐकत नसल्याचे पाहून शेवटी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या आरोपींची तक्रार केली.

दहा लाखांच्या खंडणीसाठी शेतजमिनीवर अतिक्रमण, ११ जणांवर गुन्हा
औरंगाबाद : दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी इटखेडा येथील गट क्रमांक ६५मधील शेतजमिनीवर अतिक्रमण करून त्यातील तार कम्पाउंड तोडून सिमेंट खांबाचे नुकसान केल्याच्या आरोपावरून सातारा पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. १५ मार्च रोजी ही घटना झालेल्या या घटनेविषयी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हा नोंदविण्यात आला.
तुकाराम रघुनाथ गवळे, मधुकर लक्ष्मण गवळे, बारकू नाथा गवळे, भारत धोंडीराम गायकवाड, कडुबा केशव जंगले, दौलत गोपीनाथ जंगले, कृष्णा कचरू गायकवाड, मनोहर लक्ष्मण गवळे, उमेश रावसाहेब गवळे, प्रवीण पुंजाराम गवळे ( सर्व रा. ईटखेडा )अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.तक्रारदार राजेशप्रकाश नथुराम शर्मा (६६,रा.बन्सीलालनगर) यांच्या तक्रारीनुसार १५ मार्च रोजी आरोपींनी ईटखेडा येथील त्यांच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीवरील तारेचे कुंपण आणि सिमेंटचे खांब उखडून फेकले. ही जमीन आमची आहे, असे म्हणून त्यांनी अतिक्रमण केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर शर्मा आणि त्यांचे कर्मचारी मौजकर हे शेतात गेले असता आरोपींनी त्यांना दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर तुम्हाला जमिनीवर पाय ठेवू देणार नाही, तुमचा गेम करून टाकू, अशी धमकी दिली.
या घटनेनंतर त्यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चार महिन्यांनंतरही आरोपी ऐकत नसल्याचे पाहून शेवटी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या आरोपींची तक्रार केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक डी. एस. सिनगारे यांनी चौकशी केली असता, तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार १४ जुलै रोजी शर्मा यांच्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक सिनगारे तपास करीत आहेत.