वीज ग्राहकांना वाढीव वीजदराचा शाॅक; ६८ रुपयांपर्यंत वाढणार वीज बिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:45 IST2025-07-01T13:40:48+5:302025-07-01T13:45:02+5:30
आजघडीला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना स्वस्तात वीज मिळणार आहे, पण त्यांची वीज स्वस्त करूनही महावितरण मालामालच होणार असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.

वीज ग्राहकांना वाढीव वीजदराचा शाॅक; ६८ रुपयांपर्यंत वाढणार वीज बिल
छत्रपती संभाजीनगर : राज्यात १ जुलैपासून १०० युनिटपेक्षा कमी वापरणाऱ्या ग्राहकांना स्वस्तात वीज मिळणार आहे, पण १०० पेक्षा अधिक युनिटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वाढीव वीज दराचा ‘शाॅक’ बसणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ६ लाख वीज ग्राहकांना वाढीव वीजबिलाला सामोरे जावे लागणार आहे. ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना ६८ रुपयांपर्यंत वाढीव वीजबिलाला सामोरे जावे लागणार आहे.
घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांना वीजदरात आगामी पाचही वर्षांत कपात करण्याचे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिले आहेत. यानुसार राज्यात पहिल्या वर्षी १० टक्के, तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षांत २६ टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आजघडीला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना स्वस्तात वीज मिळणार आहे, पण त्यांची वीज स्वस्त करूनही महावितरण मालामालच होणार असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.
आजपासून असा होईल दरात बदल (युनिटनुसार)
युनिट - पूर्वीचे दर १ जुलैपासून
बीपीएल-१.७४-१.४८
१ ते १०० - ६.३२ - ५.७४
१०१ ते ३०० - १२.२३ - १२.५७
३०१ ते ५०० - १६.७७ - १६.८५
५०० वर - १८.९३ - १९.१५
एक प्रकारे दरवाढच
कमी वीज वापरणाऱ्यांना सवलत देण्यात आली. मात्र, जास्त वापर करणाऱ्यांकडून सवलतीचे पैसे वसूल केले जातील. आयोगाने केलेली दरवाढ ही ग्राहकांच्या विरुद्ध आहे. ग्राहकांना साधारण ८ ते १० टक्के जास्त वीज बिल येईल. सोलार वापरणाऱ्या ग्राहकांनाही फटका बसणार आहे. इतकी दरवाढ केल्यानंतरही महावितरणच्या सेवा सुधारणार आहेत का?
- हेमंत कापडिया, माजी ग्राहक प्रतिनिधी, वीज नियामक आयोग.
जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या
वर्गवारी- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळ- छत्रपती संभाजीनगर शहर मंडळ - एकूण
घरगुती - ३,५९,१४७ - ३,०९,०६६ - ६,६८,२१३
वाणिज्य - २६,१२२ - ३६,६२१ - ६२,७४३
औद्योगिक - ९,३४६- ७,३०५ -१६,६५१
कृषी - २,१५,५२७ - २,२४४ -२,१७,७७१
पाणीपुरवठा -१,३४० - ५१ - १,३९१
पथदिवे - २,६५७ - १,४८७ - ४,१४४
यंत्रमाग- ० १६ - १६
इतर - ३,८९३ - २,७३० - ६,६२३
एकूण ग्राहक - ६,१८,०३२ - ३,५९,५२० - ९,७७,५५२