खाकीचा गैरवापर थांबेचना; ‘आम्ही पोलिस आहोत’ म्हणत वृद्धांचा लाखोंचा ऐवज मिनिटांत गडप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:40 IST2025-05-08T15:36:24+5:302025-05-08T15:40:02+5:30

याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Elderly people loot lakhs of rupees in minutes by saying 'We are police' | खाकीचा गैरवापर थांबेचना; ‘आम्ही पोलिस आहोत’ म्हणत वृद्धांचा लाखोंचा ऐवज मिनिटांत गडप

खाकीचा गैरवापर थांबेचना; ‘आम्ही पोलिस आहोत’ म्हणत वृद्धांचा लाखोंचा ऐवज मिनिटांत गडप

छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर भागात तोतया पोलिसांचा धुमाकूळ सुरूच असून, दि. ५ रोजी, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला पोलिस असल्याचे सांगून तोतयांनी लुबाडले. वृद्ध महिलेचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र लुबाडून नेले. ही घटना सकाळी पावणे सातच्या सुमारास जवाहर कॉलनी रोडवर सासवडे हॉस्पिटलच्या अलीकडे घडली. फिर्यादी रमेश सदाशिव घोटनकर (८०, रा. जवाहर कॉलनी), हे बँकेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. पत्नी आशा यांच्यासोबत सोमवारी सकाळी जवाहर कॉलनी ते सिग्मा हॉस्पिटलपर्यंत पायी फिरायला गेले होते. परत येताना रोपळेकर चौकाकडून जवाहर कॉलनीकडे जात असताना सपना मार्केटजवळ दोन अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. त्या दोघांनी रमेश यांना "तुम्ही शीतल शिंदेला ओळखता का? तो कुठे राहतो?" असे विचारले. रमेश "मी ओळखत नाही" असे सांगून पुढे निघाले.

सासवडे हॉस्पिटलच्या अलीकडे तेच दोन भामटे दुचाकीजवळ उभे होते. त्यांनी रमेश यांना बोलावून घेतले आणि "ही बाई कोण आहे?" असे विचारले. रमेश यांनी "ही माझी पत्नी आहे" असे सांगितले. त्यावर दोन्ही भामट्यांनी, "आम्ही पोलिस आहोत. तुम्ही पेपर वाचत नाही का? तुम्हाला माहीत नाही का? शीतल शिंदे हा चोर आहे. तो सोन्याच्या साखळ्या चोरण्याचे काम करतो," असे सांगितले. रमेश घाबरले. त्याचवेळी तिथे आणखी एक वृद्ध आला. त्या दोघांनी त्यालाही थांबवून घेतले आणि "तुमच्याकडे जे काही सोन्याचे दागिने आहेत, ते काढा आणि तुमच्याजवळचा रुमाल मला द्या. मी दागिने रुमालात बांधून देतो," असे सांगितले.

घाबरलेल्या रमेश यांनी रुमाल आणि पाचशे रुपये भामट्यांना दिले, तर त्यांच्या पत्नीने गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र काढून दिले. भामट्यांनी रुमाल बांधून रमेश यांच्याकडे देऊन "खिशात ठेवा" असे सांगितले आणि तेथून पसार झाले. घरी गेल्यानंतर रमेश यांनी रुमाल उघडून पाहिले, तर त्यात पाचशे रुपये होते; मात्र, दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र गायब होते. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Elderly people loot lakhs of rupees in minutes by saying 'We are police'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.