स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:17 IST2024-12-26T11:16:25+5:302024-12-26T11:17:25+5:30
ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पथकासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्या. त्याठिकाणी मजुरांच्या कोपीसमोर बसून संवाद साधत संबंधितांचे मन परिवर्तन केले.

स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली
छत्रपती संभाजीनगर : घरची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरातमध्ये जावे लागते. घरी कोणीच नसल्यामुळे लहान मुलांनाही सोबत नेण्यात येते. त्यामुळे या मुलांची शाळा बंद पडते. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह पथकाने ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांच्या शोधासाठी गुजरात राज्य गाठले. त्याठिकाणी कन्नड तालुक्यातील २२ मुलांच्या पालकांचे मन परिवर्तन करीत मुलांना शाळेत पाठविण्यास राजी केले आहे.
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षण विभागाने दिवाळीपूर्वी ऊसतोड मजूर स्थलांतर करण्यापूर्वीच अनेक पालकांचे समुपदेशन करीत मुलांना गावी ठेवण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही काही पालकांना आपल्या पाल्यांना सोबत नेल्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी बालरक्षक टीम पाठविण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून ५२ विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश मिळाले. त्याचवेळी गुजरात राज्यातील कुकरमुंडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळाेदा या ठिकाणी तब्बल २२ विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली होती. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे आवश्यक होते. त्यामुळे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे, मुख्याध्यापक देविसिंग राजपूत, शिक्षक कल्याण पवार, किशोर आगळे, ज्ञानेश्वर वाघ यांची टीम या दोन्ही ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून सांगण्यात आले. तेव्हा पालकांनाही मुलांना परत पाठविण्यास होकार दर्शविला आहे. या मुलांना घेऊन एक टीम छत्रपती संभाजीनगरकडे गुरुवारी (दि. २६) येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरू
ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहे सुरू केली आहेत. या वसतिगृहात ही मुले राहू शकतात. त्यामुळे त्यांना पाठविण्यात यावे, अशी विनंतीही शिक्षण विभागाच्या पथकाने केली. तेव्हा मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देण्याचे आश्वासन पालकांनी दिले.