छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीपूर्वी उडणार धुरळा; पुन्हा दहा रस्त्यांवर मनपाकडून पाडापाडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:59 IST2025-11-18T18:58:10+5:302025-11-18T18:59:03+5:30
विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद केले जातील. या मोहिमेची सुरुवात पडेगाव रोडवरील सरोश शाळेसमोरील रस्त्यावर केली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीपूर्वी उडणार धुरळा; पुन्हा दहा रस्त्यांवर मनपाकडून पाडापाडी!
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने जून आणि जुलै महिन्यात शहरातील मुख्य रस्त्यांवर रुंदीकरण मोहीम राबविली. जवळपास साडेपाच हजार बाधित मालमत्ता पाडण्यात आल्या. आता पुन्हा एकदा प्रशासनाने पाडापाडी मोहीम सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी दहा रस्त्यांची यादीही तयार करण्यात आली. विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद केले जातील. या मोहिमेची सुरुवात पडेगाव रोडवरील सरोश शाळेसमोरील रस्त्यावर केली जाणार आहे. येथील एमजीएम गोल्फ क्लबपर्यंतचा रस्ता मोकळा केला जाणार आहे.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी सकाळी मुख्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीत कोणत्या रस्त्यांवर मार्किंग केली, टोटल स्टेशन सर्व्हे कुठे-कुठे झाला याची माहिती घेतली. त्यानुसार १० प्रमुख रस्त्यांची यादी निश्चित करण्यात आली. मंगळवारपासूनही कारवाईला सुरुवात होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई सुरू होईल, अशी अपेक्षाही सूत्रांनी वर्तविली. महापालिकेने आतापर्यंत ज्या रस्त्यांवर पाडापाडी केली तेथील रस्ते तयार करण्यासाठी शासनाकडे साडेतीन हजार कोटी रुपयांची मागणी रविवारी मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. पुढील काही वर्षे महापालिकेला रस्ते, पाणी, ड्रेनेज, विद्युत व्यवस्थेकडे अजिबात लक्ष देण्याची गरज पडणार नाही. शहरासाठी पायाभूत सोयी-सुविधांवर अधिक भर द्यावा लागेल. पुढील ३० वर्षांचा विचार करून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. आज पुण्याची जी अवस्था झाली आहे, ती शहराची होऊ नये म्हणून या उपाययोजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या दहा रस्त्यांवर होणार पाडापाडी:
-पडेगाव-मिटमिटा मुख्य रस्ता ते गोल्फ कोर्सपर्यंत
-नगरनाका ते महापालिका हद्द
-कांचनवाडी मुख्य रस्ता ते लॉ विद्यापीठ
-रेणुका माता कमान ते उमरीकर लॉन्स सातारा परिसर
-हर्सूल टी पाॅईंट ते मनपा हद्द
-सेव्हन हिल चौक ते भाजीवाली बाई पुतळा
-महावीर चौक ते जळगाव टी पॉईंट (व्हीआयपी रोड)
-चंपा चौक ते जालना रोड (तीन टप्प्यांत)
-क्रांती चौक ते पैठणगेट
-हर्सूल कारागृह ते अंबर हिल