चालकाने दारूच्या नशेत ट्रक चालवत १८ मेंढ्याना चिरडले; मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 18:28 IST2023-08-07T18:26:26+5:302023-08-07T18:28:07+5:30
मेंढ्यांच्या कळपात घुसला भरधाव ट्रक; १८ मेंढ्या जागीच ठार, १० मेंढ्या जखमी

चालकाने दारूच्या नशेत ट्रक चालवत १८ मेंढ्याना चिरडले; मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान
सिल्लोड: शहरातील सूत गिरणी मैदानावर जाणाऱ्या मेंढ्यांना भरधाव ट्रकने चिरडले. यात १८ मेंढ्या जागीच ठार झाल्या तर १० मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज दुपारी ४.३० वाजता भराडी-सिल्लोड रस्त्यावर झाला.
सिसारखेडा येथील सुभाष गुंजाळ हे आज दुपारी मेंढ्यांना चारण्यासाठी सूतगिरणीच्या मैदानावर घेऊन जात होते. दरम्यान, भराडीकडून सिल्लोडकडे येणारा भरधाव ट्रक ( क्रमांक एम एच १९ झेड ५३०८ ) मेंढ्यांच्या कळपात शिरला. यात १८ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर १० मेंढ्या गंभीर जखमी झाल्याने मेंढपाळाचे जवळपास तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.
ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार, फौजदार बी.डी. झिंझुरडे, पोलीस कर्मचारी आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुनील मिरकर, नगर सेवक सुनील दुधे, पांडुरंग दुधे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. दारुड्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.