सुशिक्षित गुन्हेगार: रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्याने छ. संभाजीनगरात थाटला बनावट ड्रग्ज कारखाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:52 IST2026-03-18T11:52:59+5:302026-03-18T11:52:59+5:30
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून कोंबड्याच्या शेडजवळ जागा निवडली; २४ तासांतच अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचा छापा, दोघांना अटक

सुशिक्षित गुन्हेगार: रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्याने छ. संभाजीनगरात थाटला बनावट ड्रग्ज कारखाना
छत्रपती संभाजीनगर : ठाण्याहून शहरात येत रसायनशास्त्रात पदवी मिळवलेल्या दोन तरुणांनी चक्क बनावट एमडी ड्रग्जचा कारखाना थाटून उत्पादन सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ७२ तासांतच अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने या ठिकाणी छापे टाकत सोमवारी दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले.
राज्यात अवैध ड्रग्ज विक्री, वाहतूक तसेच तस्करी रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. १६ मार्च रोजी शहरातील पथकाला मसनतपूर येथील शहानगरमध्ये एमडी सदृश नशेच्या पावडरची निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या आदेशाने पथकाने रात्री येथे छापा टाकला. कोंबड्यासाठी तयार केलेल्या शेडच्या पुढे गेल्यानंतर सहा बाय सहा फुटांच्या खोलीत आरोपी रोशन रवींद्र कदम (३२) व मयूर दीपक जाधव (२३, दोघे रा. ठाणे) हे ड्रग्जसदृश पावडरनिर्मिती करताना आढळले. पोलिसांनी शेडची झडती घेतली.
६५ ग्रॅम पावडरद्वारे निर्मिती
घटनास्थळी जवळपास ६५ ग्रॅम मेथॅक्वालोन पावडर, ४९० ग्रॅम क्रिस्टलाइन पावडर, ६ बाटल्यांमध्ये रासायनिक द्रव्य, ५१८ ग्रॅम अज्ञात पावडर, मिक्सर, ग्लास स्टिरर, रिंग, ड्रम, आदी साहित्य आढळले.
रसायनशास्त्रात डिप्लोमा
रोशन रवींद्र कदम (३२) व मयूर दीपक जाधव (२३) हे दोघेही ठाण्यातील आनंदनगरमध्ये राहतात. राेशनने केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असून तो व्यावसाय करतो. तर मयूर चालक म्हणून काम करतो. त्यांच्या बाळासाहेब नामक मित्राची शहरात सासूरवाडी आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी बनावट एमडी ड्रग्ज तयार करण्याचे नियोजन केले. संशय येऊ नये म्हणून एका कोंबड्यांच्या शेडच्या मागे हा प्रकार सुरू करण्याचा प्रयत्न केला. दोघांवर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बनावट उत्पादनाचे वारंवार प्रयत्न
शहरात यापूर्वी बनावट दारू, गुटखा व सुगंधी तंबाखूची निर्मिती करणारे कारखाने उघडकीस आले आहेत. प्रामुख्याने गेल्या वर्षभरात एमडी ड्रग्ज, हायड्रो गांजाची तस्करीदेखील उघडकीस आली. मात्र, तपास यंत्रणा त्याच्या मुळापर्यंत जाऊ शकल्या नाहीत. उच्चभ्रू वसाहतीमधील तरुण-तरुणींना अशा प्रकारे ड्रग्ज अधिकच्या दराने विक्री केले जाते.
बनावट एमडी ड्रग्जचे दुष्परिणाम
- खऱ्या एमडी ड्रग्जच्या तुलनेत बनावट ड्रग्जमध्ये घातक रसायने असल्याने तत्काळ विषबाधा होऊन काही तासांत मृत्यू ओढवू शकतो.
- मेंदूवर परिणाम होऊन भ्रम, अस्वस्थता जाणवते.
- हृदयाचे ठोके वाढून रक्तदाब कमी-अधिक होत तीव्र झटका येण्याची दाट शक्यता.
- दीर्घकाळ सेवन केल्यास किडनी व यकृत निकामी होण्याची शक्यता
- अनेकदा कोमात जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.