छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती

By विकास राऊत | Updated: November 13, 2023 15:13 IST2023-11-13T15:13:05+5:302023-11-13T15:13:20+5:30

४६ मंडळात कमी पाऊस, सात तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता

Drought-like situation in 920 villages of Chhatrapati Sambhajinagar district | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ४६ मंडळांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शासनाने ४० तालुक्यांव्यतिरिक्त १,०२१ मंडळांत नव्याने दुष्काळ जाहीर केला असून, त्यात जिल्ह्यातील मंडळांचा नव्याने समावेश झाला आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने जाहीर केला आहे. त्यात जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ४६ मंडळांचा समावेश करण्यात आला असून, ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात या गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे. एका मंडळात सरासरी २० गावांचा समावेश होतो. त्याआधारे जिल्ह्यातील ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती असणार आहे.

जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने १० नोव्हेंबर रोजी जाहीर केला.

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ, बालानगर, नांदर, लाेहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोड, पिंपळवाडी, विहामांडवा, फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री, आळंद, पीरबावडा, वडोद बाजार, वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी खुर्द, गारज, लासूरगाव, महालगाव, नागमठाण, लाडगाव, गंगापूर तालुक्यातील गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदूरवादा, तुर्काबाद, वाळूज, हर्सूल, सिद्धनाथ प., खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, सुलतानपुरा, बाजरसावंगी या मंडळांत, सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड, निल्लोड, भराडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार, कन्नड तालुक्यातील कन्नड, चापानेर, देवगाव रंगारी, चिकलठाणा, पिशोर, नाचनवेल, चिंचोली लिंबाजी, करंजखेड या मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

काय मिळणार लाभ?
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शैक्षणिक शुल्क माफ, रोहयोंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, टँकरने पिण्याचे पाणी पुरविणे, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांची वीज खंडित न करणे आदी लाभ दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील मंडळांतर्गत मिळतील.

Web Title: Drought-like situation in 920 villages of Chhatrapati Sambhajinagar district