डॉ. राजन शिंदे खुन प्रकरण : चौथा दिवसही पुराव्याविनाच; झुंबडा, उस्मानाबाद येथून पथक परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 12:05 IST2021-10-15T12:04:16+5:302021-10-15T12:05:57+5:30
Dr. Rajan Shinde murder case : आतापर्यंतच्या तपासात संशयितांना ओळखण्यात यश मिळत असताना संबंधितांनी सतत दिशाभूल केल्यामुळे तपास अधिक क्लिष्ट होतो आहे.

डॉ. राजन शिंदे खुन प्रकरण : चौथा दिवसही पुराव्याविनाच; झुंबडा, उस्मानाबाद येथून पथक परतले
औरंगाबाद : डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाचा उलगडा करण्यात चौथ्या दिवशीही पोलिसांना अपेक्षित यश मिळाले नाही. उस्मानाबादला पाठविलेले पथक तेथील शिक्षणशास्त्र विभागातील काहींचे जबाब नोंदवून हात हलवत परतले. शिंदे यांच्या मूळ गावी झुंबडा (जि. बुलडाणा) येथे गेलेल्या दुसऱ्या पथकालाही खुनाचा उलगडा होण्यास मदत होईल, अशी माहिती मिळाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सिडको, एन-२ भागातील निवासस्थानी डॉ. शिंदे यांचा सोमवारी (दि.११) निर्घृण खून झाला. चार दिवस उलटून गेले तरी शहर पोलिसांच्या हाती ठोस कोणतेही धागेदारे लागलेले नाहीत. आतापर्यंतच्या तपासात संशयितांना ओळखण्यात यश मिळत असताना संबंधितांनी सतत दिशाभूल केल्यामुळे तपास अधिक क्लिष्ट होतो आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या दिशानिर्देशानुसारच पथके कृती करत आहेत.
डॉ. शिंदे यांच्या पत्नी विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात प्राध्यापक आहेत. त्यांनी घटनेच्या दिवशी मोबाइलवरून पहिला कॉल उस्मानाबाद येथील सहकाऱ्यास केल्याचे सीडीआरवरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे गुन्हे शाखेचे एक पथक बुधवारी सकाळीच उपकेंद्रात पोहोचले. ज्यांना कॉल केला होता, त्यांचा जबाब नोंदवून घेतला. शिक्षणशास्त्र विभागातील इतर सहकाऱ्यांची चौकशी करून डॉ. शिंदे यांच्या पत्नीविषयी माहिती घेतली; परंतु पथकाला तेथे आरोपीपर्यंत पोहचू शकेल, अशी ठोस माहिती मिळाली नाही. गुरुवारी सकाळीच गुन्हे शाखेचे दुसरे पथक डॉ. शिंदे यांच्या मूळ गावी झुंबड्याला पोहोचले. गावातील त्यांच्या जमिनीचा काही वाद असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, पोलिसांच्या चौकशीत जमिनीचा वाद पूर्वीच मिटल्याचे समजले. डॉ. शिंदे हे अतिशय दिलदार आणि सर्वांना मदत करणारे होते, अशी माहिती गावात अनेकांनी दिली.
औरंगाबादेत अधिकाऱ्यांना ‘टास्क’
या खुनाचा तपास करण्यासाठी शहरातील टॉपच्या अधिकाऱ्यांच्या टीम तयार केल्या आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यावर स्वतंत्र व विशेष काम देण्यात आले आहे. यात तांत्रिक जबाबदारी सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांच्याकडे आहे. सीसीटीव्ही फुटेज जमा करणे, लोकेशनचा आणि वेळेचे गणित जुळविण्याची जबाबदारी उपनिरीक्षक इंगळे यांच्या पथकाकडे आहे. झुंबड्याला उपनिरीक्षक कल्याण शेळके यांची टीम गेली होती. उस्मानाबादेत सहायक उपनिरीक्षकांची टीम पाठविली. याशिवाय फिल्डची जबाबदारी उपनिरीक्षक दत्ता शेळके, अमोल मस्के, आहेर यांना सोपविली. संशयितांची चौकशी करण्याचे काम निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे आणि महिलांची चौकशी उपनिरीक्षक अनिता फासाटे करीत आहेत. उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव या सर्व तपास पथकांत समन्वय साधण्याचे काम करीत आहेत. ज्या अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली. त्यांनी सोपवलेल्या कामांचा गुरुवारी दिवसभर शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही तपासात मिळालेले नाही.
अधिकारी नॉट रिचेबल
या गुन्ह्यातील तपासाची माहिती देण्यास एकही पोलीस अधिकारी तयार नव्हता. अनेकांनी मोबाइल बंद करून ठेवले होते, तर काहींनी प्रतिसाद दिला नाही. चौकशी केलेल्या ठिकाणी दिलेल्या भेटीची माहितीही त्यांनी दिली नाही. प्रसारमाध्यमांशी तपास अधिकाऱ्यांनी बोलू नये, असे सक्त आदेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :
- पत्नीच्या जबाबात विसंगती; डॉ. राजन शिंदे खुन प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ उस्मानाबादेत
- ...अन् पोलीस आयुक्तांनी चार तास ठाण मांडले; संशयाची सुई कुटुंबियांकडे ?