विद्यापीठ ग्रंथालय बनले शाश्वत ज्ञान स्त्रोत केंद्र; स्थापनेपासून ६,३१० संशोधकांनी मिळवली पीएचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 19:29 IST2021-12-16T19:27:54+5:302021-12-16T19:29:44+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University ज्ञान स्त्रोत केंद्र हे विद्यापीठाचे मुख्य वाचनालय असून १९५८ मध्ये स्थापन विद्यापीठ ग्रंथालय आजही लाखो पुस्तकांमुळे समृद्ध आहे.

विद्यापीठ ग्रंथालय बनले शाश्वत ज्ञान स्त्रोत केंद्र; स्थापनेपासून ६,३१० संशोधकांनी मिळवली पीएचडी
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University) स्थापनेपासून ६ हजार ३१० संशोधकांनी संशोधन करून पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनाचे डिजिटलायझेशन करून त्याचे संवर्धन विद्यापीठ ग्रंथालय करत आहे. हार्डकाॅपीपासून सीडी-डीव्हीडी असा झालेला प्रवास आता ऑनलाइनपर्यंत येऊन थांबला आहे. हे संशोधन संशोधक, अभ्यासकांसाठी संदर्भासाठी उपलब्ध करून देताना वाड्मयचाैर्यालाही बऱ्यापैकी चाप लागला आहे.
ज्ञान स्त्रोत केंद्र हे विद्यापीठाचे मुख्य वाचनालय असून १९५८ मध्ये स्थापन विद्यापीठ ग्रंथालय आजही लाखो पुस्तकांमुळे समृद्ध आहे. या ग्रंथालयातील डिजिटलायझेशन राज्यातच नव्हे तर देशातही एक पाऊल पुढे आहे. संशोधक विद्यार्थ्यांना सीडी, डीव्हीडी, प्रबंध सादर करून ग्रंथालय प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करणारी देशातील पहिली लायब्ररी असल्याचे ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ. धर्मराज वीर म्हणाले. आजपर्यंत झालेले प्रत्येक संशोधन ऑनलाइन उपलब्ध आहे. २०१२-१३ मध्ये तत्कालीन कुलगुरू डाॅ. विजय पांढरीपांडे यांच्या काळात सर्व प्रबंधांचे स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन झाले.
मराठी- हिंदीला चोरी तपासण्याची प्रतीक्षा
वाङ्मयचौर्य शोधण्यासाठी युजीसीकडून मिळालेल्या साॅफ्टवेअरच्या वापरामुळे ‘कॉपी’ मारून आलेले प्रबंध परत केले जातात. योग्य दुरुस्तीनंतरच ते पुन्हा सादर होतात. पुन्हा सॉफ्टवेअरद्वारे तपासणी करूनच ते स्वीकृत केले जातात. यात मराठी आणि हिंदी भाषेतील तपासणी होऊ शकत नसल्याने त्यासाठी नव्या साॅफ्टवेअरची मागणी केलेली आहे. तीही लवकरच पूर्ण होईल.
सीडी-डीव्हीडी लायब्ररी
यूजीसीच्या निकषांप्रमाणे आणि शोधप्रबंधाच्या साच्यातच संशोधकांना प्रबंध तयार करून सीडी डीव्हीडीत जमा करावा लागतो. त्यासाठी ग्रंथालयात स्वतंत्र सीडी डीव्हीडी लायब्ररी आहे. संदर्भानुसार त्या एका क्लिकवर त्या यंत्रातून बाहेर येतात, असे वीर म्हणाले.
सर्वात पहिला प्रबंध रसायनशास्त्र विषयात
कमलाकर आनंद ठाकर यांनी रसायनशास्त्र विषयात स्टडीज् इन ऑक्सिजन हेट्रोसायकलिक्स हा प्रबंध जून १९६२ मध्ये ग्रंथालयात सादर केला. तो १५५ पानांचा टंकलिखित प्रबंध आहे. तेव्हापासून आजपर्यंत ६३१० जणांनी पीएच.डी.चे प्रबंध सादर केले
कोरोना काळात दिले १,७७६ ई प्रमाणपत्र
१ जून २०२० ते १५ डिसेंबर २०२१ या कोरोनाचे निर्बंध होते. मात्र या काळात विद्यापीठातील ग्रंथालयात ऑनलाइन ८२१ प्रबंध व ९३५ अंतिम संशोधन आराखडे सादर झाले. त्यांची ऑनलाइन तपासणी करून ई प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ. धर्मराज वीर यांनी दिली.
सर्वाधिक संशोधन
विषय -संशोधन
प्राणीशास्त्र -६९७
वनस्पतीशास्त्र -५११
रसायनशास्त्र -४९३
हिंदी -४४२
मराठी -३९९
अर्थशास्त्र -३७६
इंग्रजी -३७०
भौतिकशास्त्र -३१७
सर्वात कमी संशोधन
कृषी -१
आयुर्वेद -१
विदेशी भाषा -१
कीटकशास्त्र -१
वैद्यकीय जीवशास्त्र -१
वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र -१
तत्त्वज्ञान -१
स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग -१