घरगुती वाद शिगेला; अंगणवाडी सेविकेचा कोयत्याने गळा चिरून पोस्टमन पतीने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:34 IST2025-06-16T14:32:48+5:302025-06-16T14:34:23+5:30

वैजापूर तालुक्यातील घटना; पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी केली अटक

Domestic dispute reaches its peak; Anganwadi worker murdered by postman husband by slitting her throat | घरगुती वाद शिगेला; अंगणवाडी सेविकेचा कोयत्याने गळा चिरून पोस्टमन पतीने केला खून

घरगुती वाद शिगेला; अंगणवाडी सेविकेचा कोयत्याने गळा चिरून पोस्टमन पतीने केला खून

वैजापूर : घरगुती वादातून कोयत्याने गळा चिरून अंगणवाडी सेविकेचा तिच्या पोस्टमन पतीनेच खून केल्याची घटना तालुक्यातील राहेगाव येथे शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. अनिता चांगदेव शेलार (वय ५५) असे मयत महिलेचे नाव आहे.

राहेगाव येथील चांगदेव शेलार (वय ५९) हा पोस्टमन असून, तो पंढरपूर येथून शनिवारी सायंकाळी आला. त्यानंतर पत्नी अनितासोबत जेवण करून ते दोघे त्यांच्या खोलीत झोपले. त्यांचा मुलगा प्रवीण हा बजाजनगर येथे गेल्याने बाजूच्या खोलीत त्यांची सून मीना आणि तीन मुले झोपली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास आरोपी चांगदेव याने पत्नीचा कोयत्याने गळा चिरून खून केला. यावेळी बाजूच्या खोलीतील सून मीना प्रवीण शेलार यांना आवाज आल्याने त्या जागी झाल्या. त्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता, सासरे चांगदेव यांच्या हातात कोयता दिसला, तर त्यांची सासू अनिता या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मीना यांना पाहताच चांगदेव पळून गेला. मीना यांनी याबाबतची माहिती नातेवाईक आणि शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थ जमा झाले. अनिताचा भाऊ वाल्मीक आवारे यांनी रक्तबंबाळ अवस्थेत अनिता यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे तपासून डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. रविवारी दुपारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

फिर्याद देण्यास नातेवाइकांची टाळाटाळ
याप्रकरणी मयत अनिता शेलार यांच्या नातेवाइकांकडून फिर्याद देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी हवालदार किरण गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांगदेव शेलार विरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार प्रवीण पाटील हे करीत आहेत. मयत अनिता शेलार यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, असा परिवार आहे.

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी चांगदेव शेलार याने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता, तो विहिरीत जिवंत आढळून आला. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याला विहीरीतून बाहेर काढले, असता तो पुन्हा तेथून पळून गेला. त्यानंतर दुपारच्या सुमारास पोलिसांनी त्याला शिऊर येथून अटक केली.

Web Title: Domestic dispute reaches its peak; Anganwadi worker murdered by postman husband by slitting her throat