' काहीतरी करा ! हा रस्ता मला छळतोय'; त्रस्त महिलेची पोलीस ठाण्यात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 15:45 IST2020-12-07T15:31:56+5:302020-12-07T15:45:44+5:30
औरंगाबादमध्ये महिलेने चक्क रस्त्याविरोधात तक्रार केल्याने पोलीसही चक्रावले

' काहीतरी करा ! हा रस्ता मला छळतोय'; त्रस्त महिलेची पोलीस ठाण्यात धाव
औरंगाबाद : शहरातील एका महिलेने औरंगाबाद ते फुलंब्री रस्ता मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून आपली अडवणूक करत कसल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. आजवर एखाद्या व्यक्तीपासून त्रासमुक्त करण्यासाठी तत्पर पोलीससुद्धा एका प्रयोग शाळा तंत्रज्ञ महिलेने केलेल्या या तक्रारीने गोंधळात पडले आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी नागरी उड्डयनमंत्री नितीन गडकरी यांनी निर्देश देऊनही कामात गती आलेली नाही.
संध्या घोळवे-मुंडे असे तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या औरंगाबाद शहरात राहत असून फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या १४ वर्षांपासून त्या येथे कार्यरत असून रोज औरंगाबाद ते फुलंब्री असा अप-डाउन प्रवास करत असतात. या रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने प्रवास्यांना अनंत यातनांना सामोरे जावे लागत आहे. मुंडे यांनासुद्धा दररोज खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांनी थेट औरंगाबाद-फुलंब्री या रस्त्या विरोधातच पोलिसात तक्रार केली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, रस्त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, अशी मागणी संध्या घोळवे-मुंडे यांनी केली आहे. प्रशासनाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचंही यांनी सांगितले आहे. हा रस्ता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्काबुक्की व अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल, त्याच्यामध्ये काही बदल होईल, अशी मला आशा होती. मात्र, तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला असेही त्यांनी म्हटलं आहे.
नितीन गडकरींच्या निर्देशानंतरही रस्त्याचे काम अर्धवट
मागील दोनवर्षांपेक्षा जास्त काळापासून औरंगाबाद- जळगाव या रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र, याचे काम करणारा पहिला कंत्राटदार काम अर्ध्यावर टाकून पळून केला. यानंतर दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी नागरी उड्डयनमंत्री नितीन गडकरी यांनी निर्देश देऊनही कामात गती आलेली नाही. औरंगाबाद - फुलंब्री हे अंतर ३० किमी असून यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. ही वाहतूक एकेरीच होत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.