अनुदानाच्या प्रतीक्षेतच गेली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी; खरीप हंगाम हातचा गेल्याने निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:34 IST2025-10-30T19:34:14+5:302025-10-30T19:34:39+5:30
अनुदानाच्या प्रतीक्षेतच गेली ८२ हजार शेतकऱ्यांची दिवाळी, सिल्लोड तालुक्यातील स्थिती;

अनुदानाच्या प्रतीक्षेतच गेली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी; खरीप हंगाम हातचा गेल्याने निराशा
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील ८२ हजार २३५ शेतकऱ्यांच्या १ लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ८१ हजार २४ हेक्टरवरील मका, कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर तहसील प्रशासनाने ६९ कोटी २५ लाख ४२ हजार २५० रुपयांच्या मदत निधीची मागणी राज्य शासनाकडे करूनही अद्याप एक छदामही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मदती निधीची प्रतीक्षा करून दिवाळी सरली तरीही पैसे मिळत नसल्याने राज्य शासनाच्या भूमिकेविषयी शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या ८० टक्के पिकांचे नुकसान झाले होते. उर्वरित २० टक्के पिके हाती येतील, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाने दगा दिला. २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पूर्व संध्येला पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सलग ८ दिवसांत उरले सुरले २० टक्के पीकही पाण्यात बुडाले. २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा आमठाणा, तळणी, शिंदेफळ सर्कलमध्ये ढगफुटी झाली, म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण १०० टक्के पिके ही नष्ट झाली आहेत. हेक्टरी शेतकऱ्यांचे जवळपास एक लाखांचे नुकसान झाले आहे; मात्र शासनाने हेक्टरी केवळ १० हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु या आश्वासनाचाही शासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली होती; मात्र अजून एकही शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही.
लवकरच मदत मिळेल
सिल्लोड तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसानभरपाई जमा केली जाणार आहे.
- सतीश सोनी, तहसीलदार सिल्लोड.
जीव गेल्यावर मदत देणार का...?
अतिवृष्टीत पिके वाहून गेली, घरांची पडझड झाली, दिवाळीत आम्हाला दिवा पेटवता आला नाही. डोक्यावर कर्जाचे डोंगर आहे. आता आम्ही शासनाकडून मिळणाऱ्या तोकड्या मदतीत घर चालवायचे की कर्जाची परत फेड करायची...?
- ज्ञानेश्वर गुंजाळ, शेतकरी, पिंपळगाव पेठ.
कधी मिळणार नुकसानभरपाई
माय बाप शासन नुकसानभरपाई कधी देणार? दिवाळी संपून आठ दिवस झाले, अजून आम्हाला दमडी मिळाली नाही. घोषणा हेक्टरी १८ हजारांची; मात्र प्रत्यक्षात १० हजार देण्याचा जीआर शासनाने काढला आहे, ही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे.
- पंकज आमटे, शेतकरी, देऊळगाव बाजार