जिल्हा हिवताप कार्यालयाला भरले ‘हिव’!

By Admin | Updated: November 25, 2014 00:57 IST2014-11-25T00:36:02+5:302014-11-25T00:57:08+5:30

उस्मानाबाद : सध्या राज्यभरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जिल्हाभरात आजवर डेंग्यूसह गॅस्ट्रो, विषमज्वर, कावीळ, तापाचे मिळून शेकडो रुग्ण आढळून आले आहेत.

District Hivatap's office filled the 'Hiv'! | जिल्हा हिवताप कार्यालयाला भरले ‘हिव’!

जिल्हा हिवताप कार्यालयाला भरले ‘हिव’!


उस्मानाबाद : सध्या राज्यभरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जिल्हाभरात आजवर डेंग्यूसह गॅस्ट्रो, विषमज्वर, कावीळ, तापाचे मिळून शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. असे असतानाच साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी महत्वाची भूमिका मानल्या जाणाऱ्या जिल्हा हिवताप कार्यालयाला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्हाभरात मिळून ७७ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात साथीच्या वेगवेगळ्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामध्ये डेंंग्यू सोबतच विषमज्वर, ताप, काविळ, गॅस्ट्रो, चिकुन गुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागात डेंग्यूचेही रुग्ण आढळून येत आहेत. आजवर २६ जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. तसेच गॅस्ट्रोचे १९६ रुग्ण आढळून आले होते. विषमज्वरचे १६९ तर सातजणांना काविळची लागण झाल्याचे समोर आले होते. डेंग्यू हा आजार ‘एडिस एजिक्टाय’ या डासांमुळे होतो. सदरील डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात म्हणजेच सिमेंटची टाकी, रांजण, प्लास्टिकच्या बाटल्या, शोभेच्या कुंड्या, निरुपयोगी टायर्समधील पाण्यामधील पाण्यामध्ये मोठ्या झपाट्याने होते. अशा डासांनी चावा घेतल्यानंतर डेंग्यू, चिकुन गुनियासारख्या आजाराची लागण होते.
दरम्यान, अशा आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विशेषत: हिवताप कार्यालयाकडून फॉगिंगसोबतच अ‍ॅबेटींगचेही काम केले जाते. परंतु या कार्यालयाची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे. जिल्हा हिवताप अधिकारी पद मागील काही महिन्यांपासून रिक्त आहे. आरोग्य पर्यवेक्षक यांची सहा पदे मंजूर आहेत. परंतु, आजघडीला एकही कर्मचारी कार्यरत नाही. सर्वच्या सर्व पदे रिक्त आहेत. साथरोगाच्या काळात प्रयोगशाळा तत्रज्ञांची भूमिका महत्वाची असते. मात्र ४७ पैकी १९ कर्मचाऱ्यांची पदे रिकामी आहेत. आरोग्य सहायकाची ३६ पदे मंजूर असताना सध्या ११ पदे रिक्त आहेत. किटक संहारकाची जिल्ह्यासाठी दोन पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक रिक्त आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिकाही तितकीच महत्वाची असते. त्यामुळेच की काय जिल्ह्यासाठी १०१ पदे मंजूर करण्यात आली होती. आजघडीला यातील ३० पदे रिक्त आहेत. वरिष्ठ क्षेत्र कर्मचाऱ्यांची दोन पदे मंजूर असताना सध्या एकही पद भरलेले नाही. कनिष्ठ लिपीकाचे दोन पैकी एक तर क्षेत्र कर्मचाऱ्यांची ८ पैकी ४ पदे रिक्त आहेत.
एकूण रिक्त पदाच्या संख्येवर नजर टाकली असता, २१७ पैकी ७७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या साथीच्या आजारांचा फैलाव झाला असल्याने या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांची तारांबळ होत आहे. त्यामुळे सदरील रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी होवू लागली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District Hivatap's office filled the 'Hiv'!