मुलींचे फोटो काढण्यावरून वाद, समतानगरमध्ये ५० ते ६० जणांत तुंबळ हाणामाऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:50 IST2025-12-09T16:45:37+5:302025-12-09T16:50:02+5:30
मध्यरात्री मोठा तणाव : पोलिसांची वेळीच धाव; मुलींवर बलात्कार करून कापून फेकण्याची धमकी देत अश्लाघ्य शिवीगाळ

मुलींचे फोटो काढण्यावरून वाद, समतानगरमध्ये ५० ते ६० जणांत तुंबळ हाणामाऱ्या
छत्रपती संभाजीनगर : शेकोटीजवळ बसलेल्या लहान मुलींचे काही टवाळखोरांनी मोबाइलमध्ये छायाचित्र काढल्यावरून समतानगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. ५० ते ६० जणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी होत एकमेकांवर लाठ्या काठ्या, प्लास्टिक पाइपने वार करण्यात आले. रविवारी रात्री १२ वाजता क्रांती चौकातील समतानगर ते संसारनगरमध्ये घडलेल्या घटनेने काही काळ तणाव होता. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनुचित प्रकार टळला.
तक्रारदार चालक असून संसारनगरमध्ये राहतात. ६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या तीन लहान मुली थंडीमुळे घरासमोर शेकोटीजवळ बसल्या. समतानगरच्या काही टवाळखोरांनी मुलींचे मोबाइलमध्ये छायाचित्र काढले. हे त्यांच्या मुलाने पाहिले. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास पुन्हा तेच युवक त्या परिसरातून जात होते. त्यावेळी तक्रारदाराच्या मुलाने बहिणीचे छायाचित्र का काढले, असे विचारले. पाच ते सहा जणांनी त्याला शिवीगाळ व मारहाण केली.
पाहता पाहता क्षणात ३५ ते ४० जणांचा जमाव आला
हल्लेखोरांनी त्यांच्या अन्य साथीदारांना बोलावले. मुलाच्या कुटुंबासह रहिवाशांनी धाव घेतली. समतानगरमधून अचानक ३५ ते ४० जणांचा जमाव संसारनगरमध्ये घुसला. त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मुलींवर बलात्कार करून कापून फेकण्याची धमकी देत अश्लाघ्य शिवीगाळ केली. लाठ्याकाठ्या, प्लास्टिक पाइपने हाणामारी जुंपली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पाच जणांची ओळख पटली, तपास सहायक आयुक्तांकडे
हल्लेखोरांमध्ये अल्फाज कुरेशी, निजाम कुरेशी, अमन कुरेशी, मुजमील कुरेशी, शेहबाज कुरेशी यांच्यासह ३५ ते ४० जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य हल्लेखोरांची ओळख पटविणे सुरू होते. मात्र, एकाही आरोपीला अटक झालेली नव्हती. सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख तपास करत आहेत.
सुरेवाडीतही सशस्त्र गट समोरासमोर
दुसऱ्या घटनेत हर्सूलच्या सुरेवाडीत शनिवारी रात्री शस्त्रधारी गट समोरासमोर येऊन तुंबळ हाणामारी झाली. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच पोलिस पोहोचताच अनेकांनी पोबारा केला. मात्र, यात तीन जण गंभीर जखमी झाले. यात हर्सूल पोलिसांनी फिर्यादी होत सुरेश राधाकिसन सुरे, किरण खेमचंद पचलोरे, रूपेश भागीरथ सुरे, शिवा अंबादास सुरे, मनिष गंगाधर ब्राह्मणे, कृष्णा एकनाथ ब्रह्मे, दीपक ब्रह्मे, सागर पांढरे, मनोज हरणे, रमेश खेमचंद गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला.