मतदार यादीत चुका दिसल्यास थेट निलंबन; मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:42 IST2025-11-26T19:40:13+5:302025-11-26T19:42:34+5:30
प्रत्येक भागात फिरून मतदारांच्या नावांची, त्यांच्या निवासस्थानाची शहानिशा करा असे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले

मतदार यादीत चुका दिसल्यास थेट निलंबन; मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब असून, त्या दुरूस्त करण्याची संधी आहे. त्यानंतरही चुका निदर्शनास आल्यास तर थेट निलंबन करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मनपाने मागील आठवड्यात मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. या याद्या पाहून इच्छुक उमेदवारांच्या पायाखालची वाळूच घसरू लागली. यादीत प्रचंड घोळ असल्याचे समोर येऊ लागले. आयोगानेच मनपाला यादी देताना ५८ हजार ११७ मतदारांची नावे दुबार असल्याचे सांगितले. या नावांचा शोध घेण्याची जबाबदारीही मनपावर आहे. दरम्यान, बैठकीत प्रशासक यांनी तीव्र शब्दांत चुकांबद्दल नाराजी व्यक्त केली. चुकांना माफी दिली जाणार नाही, थेट घरी पाठवण्यात येईल. प्रत्येक भागात फिरून मतदारांच्या नावांची, त्यांच्या निवासस्थानाची शहानिशा करा असे आदेश त्यांनी दिले.
मतदान केंद्रांची पाहणी करा
मनपा हद्दीत १३०० मतदान केंद्र राहतील. प्रत्येक मतदान केंद्राची वॉर्ड अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, तेथील सोयी-सुविधांचा आढावा घ्यावा, सुविधा नसतील त्या उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केल्या. उद्यापासून प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मतदार यादीमधील मतदारांची नावे शोधून देण्यासाठी दोन कर्मचारी नेमून देण्यात येणार आहेत, हेल्पडेस्कच्या माध्यमातून हे कर्मचारी मतदारांची नावे व त्यांचा प्रभाग शोधून देतील, असे ते म्हणाले.