भाजपने मराठवाडा पदवीधरलाही उमेदवार आयात केला का? प्रवेश सोहळ्यानंतर पक्षात नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:06 IST2025-10-31T19:05:22+5:302025-10-31T19:06:09+5:30
बाहेरचा सावजी मसाला, पक्षात नाराजीची फोडणी; प्रवेशांवरून पक्षात दोन गट पडणार असून काहीजण खासगीत नाराजीचा सुर आळवित आहेत.

भाजपने मराठवाडा पदवीधरलाही उमेदवार आयात केला का? प्रवेश सोहळ्यानंतर पक्षात नाराजी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तोंडावर दोन दिवसांपुर्वी मुंबई भाजप कार्यालयात बाहेरच्या सावजी मसाल्याप्रमाणे झालेल्या प्रवेश सोहळ्यामुळे पक्षात नाराजीची फोडणी पडली आहे. पक्षात जो चांगला कार्यकर्ता असतो, तो घर की मुर्गी दाल बराबर या प्रमाणे असतो. त्यामुळे बाहेरून आलेला सावजी चिकन मसाला चांगला लागतो. जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. जोपासलेल्या कार्यकर्त्यांची जर तुम्ही कदर केली नाही. तर जेवढ्या वेगाने वर चालले आहात, तेवढ्याच वेगाने खाली आल्याशिवाय राहणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात भाजपमध्ये होणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांच्या प्रवेशावर केलेले हे वक्तव्य पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रवेशांमुळे लागू पडते आहे. त्या प्रवेशांवरून पक्षात दोन गट पडणार असून काहीजण खासगीत नाराजीचा सुर आळवित आहेत.
एम.के.देशमुख व समर्थकांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्यामुळे खा.डॉ.भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे नाराज असल्याचे बोलले जात असल्याचा प्रश्न पत्रकारांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासमक्ष केला. यावर डॉ. कराड म्हणाले, मी कुणावरही नाराज नाही. शितोळे यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले नाही, मात्र नाराज असल्याचे जाहीरपणे कसे सांगणार, असे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले.
उमेदवारीचे कमिटमेंट नाही...
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार आयात करावा लागला. त्याप्रमाणे पदवीधरसाठी देखील उमेदवार आयात करणार की काय, यावर बोलतांना मंत्री सावे म्हणाले, पक्षात अनेकांचे प्रवेश होतात. कुणाच्या नाराजीचा मुद्दा नाही. पक्षाध्यक्ष निर्णय घेतात, तो आम्हाला मान्य होतो. देशमुखांमुळे इच्छुकांची नाराजी वाढेल काय, यावर सावे म्हणाले, देशमुखांना उमेदवारीचे कमिटमेंट दिलेले नाही. त्यांचा प्रवेश हा इतर प्रवेशांप्रमाणेच आहे.
केणेकरांच्या घरीच ठरले होते....
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मध्यंतरी आ.संजय केणेकर यांच्या निवासस्थानी गेल होते. त्यावेळी देशमुख आणि चव्हाण यांच्यात भेटीअंती चर्चा झाल्यानंतर प्रवेश निश्चित झाला होता. असे मंत्री सावे यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाची विभागात ताकद वाढण्याचा दावाही त्यांनी केला.