'...तानाशाही नही चलेगी'; महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकवटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 16:45 IST2022-02-25T16:44:46+5:302022-02-25T16:45:29+5:30
राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना अटक करताना केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केंद्र सरकार आणि भाजपने केला.

'...तानाशाही नही चलेगी'; महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकवटले!
औरंगाबाद: मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या व केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या दुरुपयोगाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान क्रांती चौकात धरणे दिले.
राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना अटक करताना केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केंद्र सरकार आणि भाजप करीत असून, महाविकास आघाडी सरकारला नैराश्याच्या भावनेतून सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकजुटीने आज सकाळी क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "महाविकास आघाडीचा विजय असो", "मोदी सरकार हम से डरती है - इडी को आगे करती है", ''नही चलेगी नही चलेगी दादागिरी नहीं चलेगी", "केंद्र सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय", या घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला होता.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. किशोर पाटील, सुधाकर सोनवणे, कॉंग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.