सरकारकडून तगडा पगार, तरी आम्ही लाच खाणार; वाढत्या लाचखोरीने महसूल प्रशासन बदनाम
By विकास राऊत | Updated: June 16, 2025 15:26 IST2025-06-16T15:25:54+5:302025-06-16T15:26:15+5:30
महसूल विभागात महिनाभरात तीन अधिकारी, एक लिपिक, दोन खासगी एजंट एसीबीच्या सापळ्यात

सरकारकडून तगडा पगार, तरी आम्ही लाच खाणार; वाढत्या लाचखोरीने महसूल प्रशासन बदनाम
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरूद्ध लाचखोरीची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाची लख्तरे वेशीवर टांगली जात आहेत. गेल्या महिनाभरात क्लास वन अधिकारी तीन, एक लिपिक, दोन खासगी एजंट लाचखोरीच्या प्रकरणात अडकले. शासनाकडून चांगले वेतन असतानाही अधिकारी - कर्मचारी लाच घेत असल्यामुळे महसूल प्रशासनाची बदनामी होत आहे. महसूलमधील अनेक अधिकाऱ्यांचे खासगी वसुली एजंट असून, काहींनी मर्जीतील कर्मचारीही बदली करून जिल्हाधिकारी कार्यालयात आणले आहेत.
महिनाभरातील ही प्रकरणे...
अपर तहसीलदार नितीन गर्जे यांचे १५ मे रोजी प्रकरण घडले. त्यांचे दोन खासगी एजंटही एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर २७ मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिराेळकर हे बडी रक्कम घेताना सापडले. दिलीप त्रिभुवन हा लिपीकही सोबत अडकला. त्यानंतर २४ रोजी कांचन कांबळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी ही लाचेच्या सापळ्यात अडकली.
सहा महिन्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी
एसीबीच्या आकडेवारीनुसार वरील अधिकाऱ्यांसह पैठणमधील तहसीलदार महेश सावंत, चंद्रकांत शेळके आणि सारंग चव्हाण, शहरातील महसूल सहायक शरद पाटील, हरीश शिंदे, सहा. महसूल अधिकारी काशीनाथ बिरकलवाड, ग्राम महसूल अधिकारी प्रवीण दिलवाले, दिलीप जाधव, अमिता लंगडे अडकले.
महिनाभरातील लाच मागणीची प्रकरणे...
निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर : १८ लाखांची मागणी; ५ लाख घेताना अटक
लिपीक दिलीप त्रिभुवन : १८ लाखांची मागणी ५ लाख घेताना अटक
अपर तहसीलदार नितीन गर्जे : ६० हजार घेताना दोन ‘पंटर’ अटकेत
पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे : ४० हजार घेताना अटक
सातव्या वेतन आयोगानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन
पदाचे नाव.................... मूळ वेतन श्रेणी................ प्रारंभिक मूळ वेतन........ अंदाजित एकूण मासिक वेतन
निवासी उपजिल्हाधिकारी....... ६७,७०० ते २,०८,७०० ............... ६७,७००...................... ९०,००० ते १,३०,०००
तहसीलदार........................ ५३,१०० ते १,६७,८००........... ५३,१००................... ७५,००० ते १,१०,०००
अपर तहसीलदार................ ४४,९०० ते १,४२,४००........... ४४,९००................. ६०,००० ते ९०,०००
पुरवठा निरीक्षण अधिकारी.......... ३८,६०० ते १,२२,८०० ..........३८,६०० .................. ५५,००० ते ८०,०००
तलाठी ........................... २९,२०० ते ९२,३००................ २९,२००............... ४०,००० ते ६०,०००
लिपीक ................... १९,९०० ते ६३,२००..................... १९,९००................... २८,००० ते ४५,०००