देवळाली युनानी दवाखान्याचा कारभार शिपायावरच
By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-13T23:11:57+5:302014-07-14T01:00:08+5:30
अशोक तळेकर , पिंपरीघाटा आष्टी तालुक्यातील देवळाली येथील युनानी दवाखान्यामध्ये दोन वर्षापासून डॉक्टर नसल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही.

देवळाली युनानी दवाखान्याचा कारभार शिपायावरच
अशोक तळेकर , पिंपरीघाटा
आष्टी तालुक्यातील देवळाली येथील युनानी दवाखान्यामध्ये दोन वर्षापासून डॉक्टर नसल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही. शिवाय येथील कारभार सध्या शिपायावरच असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर नसल्याने केवळ 'दवाखान्याकडे पाहा अन् पानफूल वहा' अशी येथील अवस्था आहे.
देवळाली पानाची हे चार हजार पेक्षा अधिक लोकवस्तीचे गाव आहे. येथे परिसरातील सात ते आठ वाड्यांचे ग्रामस्थ विविध कामांसाठी सातत्याने येत असतात. या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देवळाली येथे तब्बल ४० वर्षापूर्वी युनानी दवाखाना सुरु करण्यात आला. या दवाखान्यातून अनेक रुग्णांना उपचार मिळत होते. असे असले तरी दोन वर्षापूर्वी येथील डॉक्टरची बदली झाली आहे. यानंतर येथे डॉक्टर न दिल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. परिणामी रुग्णांना अधिक पैसे मोजून खाजगी उपचार घ्यावे लागत आहेत.
या रुग्णालयात आजही परिसरातील काही रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र दवाखान्यात डॉक्टरच नसल्याने रुग्णांना आल्या पावली परतावे लागते. येथे डॉक्टर उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात असली तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. या दवाखान्यात सध्या शिपाई येतात. हेच शिपाई येथील कारभार हाकत असल्याचे अतुल जवणे यांनी सांगितले. या दवाखान्यातून रुग्णांना सेवा दिली जावी, अशी मागणी दत्तात्रय आमले, शिवाजी नवले, नवनाथ शेकडे आदींनी केली आहे.
येथील युनानी दवाखान्यात डॉक्टर नसल्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चाबुकस्वार म्हणाले, जागा भरण्यासंदर्भात जि.प.ला कळविले आहे.