अज्ञात वाहनाच्या धडकेत वाळूज येथील कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 20:15 IST2019-01-04T20:15:01+5:302019-01-04T20:15:21+5:30
याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वाळूज येथील कामगाराचा मृत्यू
औरंगाबाद : साल्याच्या घरी जेवण करून वाळूज एमआयडीसीकडे जाणारा दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झाला. हा अपघात छावणी परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सोमबीर भवरन शिकरवार (वय २६, रा. जोगेश्वरी झोपडपट्टी, वाळूज, मूळ रा. राजस्थान) असे मृताचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, सोमबीर हा वाळूज एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करायचा. त्याचा साला शहरातील नारेगाव येथे राहतो. गुरुवारी रात्री तो साल्याच्या घरी जेवण करण्यासाठी आला होता. जेवण करून सोमबीर मोटारसायकलने वाळूज एमआयडीसीकडे जात होता.
छावणी परिसरातील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना घाटीत दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी ६ वाजेच्या सुमारास सोमबीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोहेकॉ. मोटे तपास करीत आहेत.