घाटी रुग्णालयात बनावट नियुक्तीचा धोका; फलकांद्वारे सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:55 IST2025-06-24T13:47:45+5:302025-06-24T13:55:01+5:30

३१५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, प्रशासन सावध

Danger of fake appointments at Ghati Hospital; Warning signs posted on notice boards | घाटी रुग्णालयात बनावट नियुक्तीचा धोका; फलकांद्वारे सतर्कतेचा इशारा

घाटी रुग्णालयात बनावट नियुक्तीचा धोका; फलकांद्वारे सतर्कतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी लावतो म्हणून कोणी जर पैशांची मागणी करीत असेल तर वेळीच सावध झालेले बरे. यातून फसवणूक अथवा बनावट नियुक्तीपत्र देण्याचा प्रकार होऊ शकतो. घाटी रुग्णालयाच्या नावाखाली पूर्वी झालेल्या फसवणुकीच्या घटनांचा अनुभव घेऊन रुग्णालय प्रशासनाने जागोजागी नागरिकांना सतर्क करणारे फलक लावले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला. ३१५ चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांसह विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ही संधी साधून काही जणांकडून उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीचा उद्योग होऊ शकतो. त्यामुळे यासंदर्भात घाटी रुग्णालय प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी रुग्णालय परिसर आणि महाविद्यालय परिसरात फलक लावले आहेत.


कोणताही व्यवहार करू नये
नोकर भरती संदर्भात रुग्णालयातील कोणाशीही संपर्क साधू नये. कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये. केल्यास, त्यास ते स्वत: जबाबदार राहतील. भरती प्रक्रिया ही टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस यांच्याकडून राबविण्यात येत आहे.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, प्रभारी अधिष्ठाता

यापूर्वी फसवणुकीचे झालेले प्रकार
ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘घाटीत कामाला लावतो’ म्हणून प्रत्येकी २ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन १२ जणांना फसविल्याचा प्रकार समोर आला होता. १२ जणांना लाखोंना गंडा घालणाऱ्या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर गतवर्षी जुलै २०२४ मध्ये घाटी येथे नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ९ जणांकडून ५६ लाख ६५ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्यास बेगमपुरा पोलिसांनी अटक केली होती.
 

Web Title: Danger of fake appointments at Ghati Hospital; Warning signs posted on notice boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.