शासकीय कार्यालयातून अधिकाऱ्यांची ‘दांडी’यात्रा

By Admin | Updated: May 23, 2015 00:40 IST2015-05-23T00:15:57+5:302015-05-23T00:40:52+5:30

गेवराई : शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याने सर्व सामान्यांची कामे रखडली जात आहेत.

'Dandi' yatra of officials from Government Office | शासकीय कार्यालयातून अधिकाऱ्यांची ‘दांडी’यात्रा

शासकीय कार्यालयातून अधिकाऱ्यांची ‘दांडी’यात्रा


गेवराई : शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याने सर्व सामान्यांची कामे रखडली जात आहेत. कार्यालयात वेळेवर हजर रहावे, अशा सूचना असून सुद्धा ते येत नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
येथील पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, तहसील, पाणीपुरवठा विभाग, जि.प. उपबांधकाम विभागसह अनेक कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी कार्यालयाच्या म्हणजे सकाळी १० वा. येण्याची वेळ तर कार्यालय ५ वा. बंद होण्याची वेळ असताना देखील हे सर्व अधिकारी व कर्मचारी दुपारी १२ वा. येतात तर काही अधिकारी कार्यालयात दिसतच नाहीत.
या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अधिकारी नसल्याने कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात. या नागरिकांना ३० ते ४० कि.मी.अंतरावरुन पैसे खर्चून यावे लागते. मात्र अधिकारी नसल्याने नाहक खर्च सहन करावा लागत आहे. काही अधिकारी कार्यालयात असेच तर लगेच गायब होताना दिसतात. त्यामुळे नागरिकांची कामे होताना वेळ लागत आहे.
या आधीही या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र याचा काही उपयोग झाला नाही. या सर्व दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी अक्षय पवार, डॉ. शेख इब्राहिम, सचिन दाभाडे, पप्पू गायकवाड यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: 'Dandi' yatra of officials from Government Office