औरंगाबादच्या दमडी महालचा समावेश मनपाच्या वारसा यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:12 IST2018-12-01T14:06:59+5:302018-12-01T14:12:19+5:30
दमडी महालला गतवैभव कसे मिळवून देता येईल, याचे कोणतेच नियोजन मनपाकडे नाही.

औरंगाबादच्या दमडी महालचा समावेश मनपाच्या वारसा यादीत
औरंगाबाद : रस्ता रुंदीकरणात अडसर ठरत असल्याचे कारण दाखवून दोन वर्षांपूर्वी महापालिकेनेच ऐतिहासिक दमडी महालचा काही भाग पाडला. आता महालचे काही अवशेष शिल्लक आहेत. आता या अवशेषाची नोंद शहरातील वारसा स्थळांच्या यादीत करण्यात येणार आहे. दमडी महालला गतवैभव कसे मिळवून देता येईल, याचे कोणतेच नियोजन मनपाकडे नाही.
शहरातील ऐतिहासिक वास्तूंची सूची पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीत शहरातील १४४ वास्तूंचा ऐतिहासिक वास्तू म्हणून समावेश करण्यात आला होता. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद केली आहे. या निधीतून सात दरवाजांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महमूद दरवाजा, कटकट गेट, जाफरगेट, बारापुल्ला दरवाजा, खिजरी दरवाजा, काळा दरवाजाचा समावेश आहे.
नहर-ए-अंबरीच्या गोमुखाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे, तसेच दुर्लक्षित वास्तूंना या यादीत समाविष्ट करून सूची पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक वस्तूंविषयी शहरात दिशादर्शक फलक लावण्यात येतील. महापालिकेने ७ दरवाजे व गोमुखाचा परिसर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.