छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा ४१ अंशांवर जाऊन पोहोचल्याने बुधवारी बाजारपेठेत वर्दळीवर त्याचा परिणाम दिसून आला. यामुळे दिवसभर व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करताना दिसून आले. सायंकाळी खरेदीसाठी ग्राहक घराबाहेर पडले आणि नेमके याच वेळी मुख्य बाजारपेठेतील विद्युत पुरवठा खंडित झाला. हे काही एका दिवसाचे नव्हे तर मागील २० दिवसांपासून हीच समस्या येत आहे. सायंकाळीही वीज खंडित होत असून, ऐन लग्नसराईत व्यावसायिकांवर ‘संक्रांत’ ओढावली आहे. वेळेच्या आधी लाइट बिल भरूनही विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे.
महिनाभराच्या खंडानंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या हंगामात दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र, मागील २० दिवसांपासून मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली भारनियमन सुरू आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता ऐन ग्राहकीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असल्याने नुकसान होत आहे. ज्यांच्याकडे जनरेटर नाही त्या दुकानात असलेले ग्राहक थोड्यावेळ लाइटची वाट पाहून खरेदी न करता उठून जात आहेत.
भारनियमनाचा फटका कोणत्या भागांना?उस्मानपुरा, क्रांती चौक, पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा, गुलमंडी, रंगारगल्ली, मछलीखडक, सिटीचौक, सराफा बाजार, निरालाबाजार व आसपासच्या परिसरात वीजपुरवठा दररोज खंडित होत आहे.
रोज सायंकाळीच बत्ती ‘गुल’भारनियमन केल्यास पहिले मोबाइलवर मेसेज येत असे. पण, आता दिवसातून तीन ते चार वेळा अघोषित भारनियमन केले जात आहे. महावितरण अशी कोणती दुरुस्ती करते की सायंकाळी मुख्य बाजारपेठेतील विद्युत पुरवठा खंडित करावा लागत आहे?-योगेंद्र मुगदिया, व्यापारी
सिंधी कॉलनीत तीनदा गेली लाइटबुधवारी सिंधी कॉलनीत दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान तीन वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच मछलीखडक येथे सायंकाळी ६:२५ वाजता लाइट गायब झाली. संपूर्ण व्यवसायाचा बट्ट्याबोळ झाला. मागील २० दिवसांपासून हे असेच सुरू आहे.-रोमी छाबडा, व्यापारी
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करासर्व व्यापारी वेळेच्या आत लाइट बिल भरत असतात. काही कारणास्तव एखाद्या व्यापाऱ्याकडून लाइट बिल भरल्या गेले नाही तर दुकानातील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. आता ऐन हंगामात दिवसा व सायंकाळी लाइट नाही. दररोज व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका व मानसिक ताण सहन करावा लागत असून, यास जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या कामाची चाैकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.-लक्ष्मीनारायण राठी , उपाध्यक्ष, व्यापारी महासंघ
लाइट गेली की दुकानातून ग्राहक उठून जातोयदिवस असो की रात्र लाइट गेली की, उकाड्यामध्ये ग्राहक जास्त वेळ बसत नाही. ते सरळ खरेदी न करता दुकानातून उठून जात आहे. ही माझ्या एकट्या दुकानाची नव्हे तर अनेक दुकानात हीच परिस्थिती आहे. मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली सुरू केलेले अघोषित भारनियमन बंद करा.-उदय साहूजी, व्यापारी
व्यापारी महासंघ मोर्चा काढण्याच्या तयारीतशहरात दररोज नियमितपणे मुख्य बाजारपेठेत भारनियमन होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसभरात दोन ते तीन वेळा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. खरेदीच्या हंगामात सायंकाळीही बाजारपेठेतील विद्युत पुरवठा, तोही दररोज खंडित केला जात आहे. याविरोधात जिल्हा व्यापारी महासंघ आक्रमक झाला असून, महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.-संजय कांकरिया, अध्यक्ष, व्यापारी महासंघ