३० देशांचे सांस्कृतिक राजदूत छत्रपती संभाजीनगरात; पारंपरिक स्वागताने भारावले पाहुणे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:10 IST2025-11-22T15:09:25+5:302025-11-22T15:10:18+5:30
पारंपरिक स्वागताने भारावले पाहुणे, म्हणाले, ‘वाॅव... इट्स व्हेरी नाइस...’

३० देशांचे सांस्कृतिक राजदूत छत्रपती संभाजीनगरात; पारंपरिक स्वागताने भारावले पाहुणे!
छत्रपती संभाजीनगर : संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित तीन दिवसीय 'ऐक्यम २०२५' या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक उत्सवानिमित्त शुक्रवारी जगभरातील ३० हून अधिक देशांचे सांस्कृतिक राजदूत दाखल झाले आहेत. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावलेल्या पाहुण्यांच्या मुखातून ‘वाॅव...इट्स व्हेरी नाइस...’ असे शब्द बाहेर पडले.
भारताच्या माजी राजदूत मोनिका कपिल मोहता आणि सांस्कृतिक उद्योजक सिद्धांत मोहता यांनी स्थापन केलेल्या, 'ऐक्यम’ने भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्थळांवर सांस्कृतिक प्रवासाची सुरुवात केली आहे. युनेस्को, महाराष्ट्र पर्यटन आणि छत्रपती संभाजीनगर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चिकलठाणा विमानतळाचे संचालक शरद येवले यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. रात्री पंचतारांकित हाॅटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुंबई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव, ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक योगेश निरगुडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. विविध देशांचे राजदूत शनिवारी बीबी का मकबरा, दौलताबाद (देवगिरी) आणि वेरुळ लेणीला भेट देणार आहेत.
महाराष्ट्राच्या परंपरांच्या दर्शनासह ब्राझिलियन कलाविष्कार
पंचतारांकित हाॅटेलमध्ये अजिंठा आणि वेरूळ लेणीच्या वैभवाची मोहक ओळख करून देणाऱ्या प्रस्तावनेनंतर, महाराष्ट्राच्या परंपरांचे दर्शन घडवणारा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम पार पडला. भारतीय आणि महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतींची चव, लोककला सादरीकरण, तसेच पैठणी आणि हिमरू या परंपरागत हातमाग वस्त्रांच्या अप्रतिम प्रदर्शनाचाही यात समावेश होता. प्रसिद्ध ब्राझिलियन कलाकार सर्जिओ कॉर्डेइरो यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध भित्तिचित्रकलेचे सादरीकरण करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कैलास मंदिरात आज ‘ओंकार’ कार्यक्रम
या महोत्सवात शनिवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गौरी शर्मा त्रिपाठी यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली ‘ओंकार’ हे भव्य क्लासिकल बॅले वेरुळ येथील कैलास मंदिरात सादर होणार आहे. अर्जेंटिना, इटली, लिथुआनिया, नेदरलँड्स, पेरू, पोलंड आणि स्पेन येथील कलाकार यात सहभागी होतील.