क्रूरकर्मा! हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाला आंघोळ घातली, त्याचे कपडे बदलले; घाटी रुग्णालयात नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:05 IST2022-04-22T13:04:54+5:302022-04-22T13:05:24+5:30

चोरीच्या संशयावरून मनोजला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र, तो दाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचे हातपाय बांधून फावड्याच्या दांड्याने त्यास ठेचले.

Cruel karma! After the murder, the accused bathed the corpse, changed his clothes; was taken to Ghati hospital | क्रूरकर्मा! हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाला आंघोळ घातली, त्याचे कपडे बदलले; घाटी रुग्णालयात नेले

क्रूरकर्मा! हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाला आंघोळ घातली, त्याचे कपडे बदलले; घाटी रुग्णालयात नेले

औरंगाबाद : चोरीच्या संशयावरून मनोजची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी अत्यंत शांतपणे त्याच्या अंगावरील फाटलेले कपडे, रक्ताचे डाग पाहून डॉक्टरांना संशय येऊ नये, यासाठी त्याला स्नान घातले. त्याच्या अंगावरील रक्ताचे डाग पुसून शरीर स्वच्छ केले. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याच्या अंगावरील फाटके कपडे काढून दुसरे कपडे घातल्याची माहिती पोलीस चाैकशीत समोर आली.

पोलीस सूत्राने सांगितले की, आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. चोरीच्या संशयावरून मनोजला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र, तो दाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचे हातपाय बांधून फावड्याच्या दांड्याने त्यास ठेचले. हे करताना प्रत्येकाने त्याला दांड्याचे फटके दिले. मारहाणीत घायाळ झालेला मनोज चोरी केली नसल्याचे रडत सांगत होता. मात्र, निर्दयी आरोपींना त्याची दया आली नाही. कोणी दांड्याने तर कोणी लाथाबुक्क्यांनी सुमारे तासभर त्याला मारहाण केली. यात तो मरण पावल्याचे आरोपींच्या लक्षात आले. नंतर स्नान घालून, अंगावरील कपडे बदलून त्यास घाटीत नेले. घाटीतील डॉक्टरांना मनोज खासगी रुग्णालयाजवळ पडलेला होता, अशी खोटी माहिती देऊन बनवेगिरी केली.

तरुणाला मारहाण करताना देत होते घोषणा
मनोजला मारहाण करताना आरोपी ‘मांगीरबाबा की जय’ अशा घोषणा देत होते. त्यांच्यापैकी काही जण मनोजच्या डोक्याला आणि खांद्याला मारू नका, असे म्हणत होते.

नऊ महिन्यांपूर्वी झाली होती आकाश राजपूतची अशीच हत्या
गतवर्षी ९ ऑगस्टला हनुमाननगर येथील चौकात तनपुरे गँगने आकाश राजपूत या तरुणाची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली होती. भर चौकात आरोपी आकाशची हत्या करीत होते. मात्र, गँगच्या दहशतीमुळे त्याच्या मदतीला कोणीही धावले नव्हते. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपी अद्यापही जेलमध्ये आहेत. मनोजची हातपाय बांधून निर्दयीपणे हत्या झाल्याने शहरवासीयांना आकाशच्या हत्येची आठवण झाली.
 

Web Title: Cruel karma! After the murder, the accused bathed the corpse, changed his clothes; was taken to Ghati hospital