शेतकऱ्यांशी गद्दारी! सिल्लोडमध्ये भेसळयुक्त खताचा कारखाना उघडकीस, १९ लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:19 IST2025-11-07T13:10:41+5:302025-11-07T13:19:53+5:30
शेतकऱ्यांच्या माथी मारले भेसळयुक्त खत! हे रॅकेट किती मोठे आहे, याचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांशी गद्दारी! सिल्लोडमध्ये भेसळयुक्त खताचा कारखाना उघडकीस, १९ लाखांचा माल जप्त
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: एका निनावी फोनमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात बनावट खतांच्या अवैध निर्मिती आणि पॅकिंगचा मोठा पर्दाफाश झाला आहे. मोढाखुर्द येथील 'लीप फर्टिलायझर्स अँड केमिकल्स' कंपनीच्या गोडाऊनवर कृषी विभागाने छापा मारून तब्बल १९ लाख ५ हजार ६४० रुपयांचे बनावट खत जप्त केले आहे.
कृषी विभागाला सदर गोडाऊनमध्ये बनावट खते पॅकिंग होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागीय कृषी संचालक सुनील वानखेडे आणि जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता छापा टाकला. ही कारवाई दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे ६ वाजेपर्यंत सुरू होती. पथकाने १९ लाखांचे विविध कंपनीच्या नावांचे बनावट खत, २००० खतांच्या गोण्या, रॉ मटेरियल आणि लीप कंपनीसह विविध कंपन्यांच्या नावाच्या रिकाम्या गोण्या जप्त करून गोडाऊन सील केले.
नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
या अनधिकृत गोडाऊनमध्ये NPK 18-18-10, NPK 10-20-20, PROM, PDM, Zinc Solublizing Biofertilizer अशा खतांच्या गोण्या आढळून आल्या. प्लेन लाल आणि पांढऱ्या रंगाच्या खतांची लेबल नसलेल्या गोण्यांमध्ये बनावट खते भरली जात होती. कृषी अधिकारी प्रमोद डापके म्हणाले, "सदर खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यावर यात किती प्रमाणात भेसळ आहे, हे कळेल."
मालकावर गंभीर गुन्हे दाखल
पथकाने या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, त्यांनी खत विक्रीचा परवाना असल्याचा दावा केला. मात्र, खताचे पॅकिंग हा खतनिर्मितीचाच भाग असून, येथे बेकायदा पॅकिंग केले जात होते. या प्रकरणी गुणनियंत्रण निरीक्षक व कृषी अधिकारी प्रमोद पांडुरंग डापके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी लीप फर्टिलायझर्स अँड केमिकल्स कंपनीचा मालक मोहन वसंतराव हिरे यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यात बनावट खतांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री याबद्दलचे गुन्हे समाविष्ट आहेत.
शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
या कंपनीने सिल्लोड तालुक्यातील अनेक दुकानांना बनावट खत पुरवठा केला आहे. आधी बनावट बियाणे, मग बनावट खते आणि त्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण कंबरडे मोडले आहे. हे रॅकेट किती मोठे आहे, याचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.