‘दख्खनचा ताज’ घेणार मोकळा श्वास; जमीन मोजणी प्रक्रिया सुरु, अतिक्रमणावर पडणार हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 17:23 IST2022-07-28T17:22:25+5:302022-07-28T17:23:57+5:30
मकबऱ्याच्या नावावर ८४ एकर जमीन आहे. ही मोजणी पूर्ण होताच अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘दख्खनचा ताज’ घेणार मोकळा श्वास; जमीन मोजणी प्रक्रिया सुरु, अतिक्रमणावर पडणार हातोडा
औरंगाबाद : पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात बुधवारी ऐतिहासिक बिबी का मकबऱ्याच्या जागेची मोजणी करण्यात आली. यावेळी राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मोजणीला काहीजणांकडून विरोध केला जात होता; परंतु पोलीस बंदोबस्त आणि तणावपूर्ण वातावरणात मोजणी सुरू करण्यात आली. मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमणांवर हातोडा पडेल आणि दख्खनचा ताज मोकळा श्वास घेईन, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगरभूमापन कार्यालयातर्फे २० जुलैला बिबीका मकबऱ्याच्या जागेची मोजणी आणि मार्किंग सुरू केली. जवळपास ७१ वर्षांनंतर बिबी का मकबऱ्याच्या पीआर कार्डवर भारतीय पुरातत्त्व विभागाचे नाव लागले आहे. मकबऱ्याच्या नावावर ८४ एकर जमीन आहे. ही मोजणी पूर्ण होताच अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी काही जणांकडून या मोजणीला विरोध करण्यात आला. त्यामुळे ही मोजणी अर्ध्यातच थांबविण्यात आली. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता मोजणीला सुरूवात करण्यात आली. आगामी २ ते ३ दिवसांत मोजणी पूर्ण होणार आहे.
२५ पोलीस कर्मचारी तैनात
३ पोलीस अधिकारी आणि २२ पोलीस काॅन्स्टेबल अशा तगड्या बंदोबस्तात मोजणीला सुरुवात होताच काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मोजणीस्थळी धाव घेतली. मात्र, तणावपूर्ण वातावरणात ही मोजणी बुधवारी पूर्ण करण्यात आली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण सहायक संजय रोहणकर, सर्वेअर अशोक तुरे, सिटी सर्व्हेचे हेमंत औटी, शेख आरिफ, नरसिंह चिलकरवार आदी उपस्थित होते.