कळंब : श्रावणात तरी ‘वरुण राजा’ पावेल ही अपेक्षा ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांची चांगला पाऊस होत नसल्याने मोठी निराशा होत आहे. सततची दुष्काळी स्थिती व अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यातून सावरतो न सावरतो तोच कळंब तालुक्यातील शेतकरी आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे. अर्धा पावसाळा संपला तरी केवळ १५९ मि.मी. पाऊस झाला असून, अनेकांचे पेरलेलेच उगवले नाही तर ज्याचे उगवले त्याची पिके जगतील याचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे श्रावणातही घन निळा बरसत नसल्याने बळीराजाच्या मनात श्रावणमासी ही हर्ष दिसून येत नाही.
तालुक्यातील जवळपास एक लाखाच्या आसपास असलेल्या लागवड क्षेत्रापैकी ८० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाखालील पिके घेण्यात येतात. सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मुग व मका आदी नगदी समजली जाणारी पिके या हंगामात घेतली जात असल्याने कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा प्रमुख आर्थिक आधार बनला आहे. अशा या प्रमुख हंगामाला मागील चार वर्षात निसर्गाची चांगली साथ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटून सर्व आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांस अधिकच नागवले आहे.
याही परिस्थितीमध्ये खचून न जाता शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतीची मशागत केली. परंतु पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसासाठी तब्बल एक महिना प्रतिक्षा करावी लागली. मृग, आर्द्रा ही प्रमुख नक्षत्रे कोरडीठाक गेली यातच ७ जुलैपासून पावसाचे आगमन होवून पेरणीयोग्य ओल निर्माण झाल्यामुळे मोठे धाडस करुन शेतकऱ्यांनी चाढ्यावर आपली मुठ धरली. यानंतर मात्र चांगला पाऊस झाला नाही. दिवसभर ढगाळ हवामान असते. परंतु त्यांचे पावसात रुपांतर होत नसल्याने प्रत्येक दिवस आला तसा जात आहे. निसर्गाच्या या अनाकलनीय कोड्याने शेतकरी मात्र हतबल झाला आहे.
पेरलेले उगवलेच नाही
तालुक्यात सर्वात जास्त सोयाबीनचा पेरा झाला आहे. जवळपास ४८२५० हेक्टरवर तालुक्यात सोयाबीनचा पेरा झाला असून, यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या उगवण क्षमतेचा प्रश्न ‘दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीप्रमाणे उभा राहिला आहे. तालुक्यात सोयाबीन न उगवलेल्या ५१४ तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असून, यावर ३७० शेतकऱ्यांच्या क्षेत्राचे पंचनामे उरकण्यात आले आहेत. अजूनही सोयाबीन न उगवलेल्या तक्रारींचा पाऊस सुरुच असून, बहुतांश शेतकऱ्यांसमोर सोयाबीनच्या उगवणक्षमतेच्या या नव्या प्रश्नाने आर्थिक व शारीरिकदृष्ट्या खचून जाण्याची वेळ आली आहे.
श्रावणमासातही हर्ष नाही
श्रावण मासी हर्ष मानसी असे श्रावण महिन्यात मोठ्या उल्हासाने म्हटले जाते. जून कोरडा गेला असला तरी श्रावणात तरी घन निळा बरसेल अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा होत आहे. मागील १५ दिवसांपासून तालुक्यात केवळ ढगाळ हवामान असून पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांना आपली पिके जगतील की नाही? जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सुटेल की नाही? पाणी पातळीत वाढ होऊन बागायत शेती पुन्हा बहरेल की नाही? असे अनेक प्रश्न सतावत आहेत.
३७० तक्रारींचा पंचनामा
जलसाठ्याची स्थिती चिंताजनक
तालुक्यातील रायगव्हाण मध्यम प्रकल्प कोरडाठाक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या मांजरा प्रकल्पातही अत्यल्प साठा आहे. शिवाय देवधानोरा, शिराढोण, ढोराळा, भाटसांगवी, आडसूळवाडी हे लघु पाटबंधारे प्रकल्प कोरडेठाक आहेत. कोठाळवाडी तलावात जोता पातळी खाली तर येरमाळा, चोराखळी, मलकापूर तलावात अर्ध्याच्या आसपास पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय तालुक्यातील १२० पेक्षा जास्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचीच अजून तहान भागलेली नाही. पाझर तलाव, गाव तलाव ही वरुण राजाच्या प्रतीक्षेत आहेत.
महसूल मंडळ पाऊस
कळंब१७० मि.मी.
ईटकूर५८ मि.मी.
शिराढोण२५६ मि.मी.
येरमाळा२१२ मि.मी.
मोहा१०३ मि.मी.
गोविंदपूर१६३ मि.मी.
एकूण सरासरी १५९ मि.मी.
१५९ मि.मी. पाऊस
तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६२४ मि.मी. आहे. हे सरासरी पर्जन्यमान जेमतेम असले तरी नियमित पाऊस झाल्यास त्यावर शेतकरी आपले कसब पणाला लावून पिके घेतो. परंतु यावर्षी जुलै अखेर ३०० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ १५९ मि.मी. पाऊस झाला आहे. यातही झालेला पाऊस तालुक्यात समसमान झालेला नसून, शिराढोण महसूल मंडळामध्ये सर्वाधिक २५६ तर सर्वाधिक कमी पाऊस ईटकूर महसूल मंडळामध्ये केवळ ५८ मि.मी. झाला आहे.
अर्धा पावसाळा कोरडा
तालुक्यात होणाऱ्या पावसाच्या दिवसांपैकी अर्धे दिवस कोरडे गेले आहेत. प्रारंभीचे रोहिणी नक्षत्र कोरडेठाक गेले. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेले मृग ही बहरला नाही. त्यानंतर पिकाच्या वाढीसाठी महत्वाचे असणारे आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. हीच अवस्था पुनर्वसू नक्षत्राची झाली असून, केवळ पुष्य नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या कशाबशा उरकल्या आहेत. एकूणच अर्धा पावसाळा कोरडा गेल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा वाढली आहे.
८० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
By admin | Updated: July 31, 2014 00:44 IST
कळंब : श्रावणात तरी ‘वरुण राजा’ पावेल ही अपेक्षा ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांची चांगला पाऊस होत नसल्याने मोठी निराशा होत आहे.
८० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}