छत्रपती संभाजीनगरात गावाला गेलेल्या कुटुंबाचे घर टार्गेट; उस्मानपुऱ्यात ४८ तासांत तीन घरफोड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:00 IST2026-03-21T12:59:47+5:302026-03-21T13:00:02+5:30
लॅच लॉक तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी; रहिवाशांमध्ये भीतीचे सावट

छत्रपती संभाजीनगरात गावाला गेलेल्या कुटुंबाचे घर टार्गेट; उस्मानपुऱ्यात ४८ तासांत तीन घरफोड्या
छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक कामानिमित्त पुण्याला गेलेल्या कुटुंबाच्या घराचे लॅच लॉक तोडून चोरांनी तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदी व रोख रक्कम लंपास केली. १८ मार्चला उघडकीस आलेल्या घरफोडीप्रकरणी १९ मार्चला उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सेवानिवृत्त किरण बालाजी कुलकर्णी हे कुटुंबासह उस्मानपुऱ्यातील कासलीवाल रेसिडेन्सीमध्ये राहतात. ९ मार्चला सकाळी ६ वाजता ते पत्नीसह पुण्यात राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. १८ मार्चला सकाळी ११ वाजता शहरात परतल्यानंतर त्यांच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. बेडरूममधील कपाट फोडून चोरांनी १ तोळ्याचे मंगळसूत्र, १ तोळ्याचे कानातले, सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे चांदीचे साहित्य, सोन्याचे २ ग्रॅमचे मणी, चांदीचे १ तोळ्याचे पायातील जोडवे, बँक लॉकरच्या चाव्या, हातातील घड्याळ व १० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
दर्शन करून परतेपर्यंत चोरांनी दोन फ्लॅट फोडले
उस्मानपुऱ्यातीलच श्रेयनगरमध्ये एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट तासाभरात फोडून चोरांनी ८० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. सुरेश खडके (७१) हे व त्यांचे भाऊ एकाच इमारतीत राहतात. १९ मार्चला सायंकाळी ६ वाजता ते व त्यांच्या भावाचे कुटुंब गुढीपाडव्याच्या निमित्ताने राममंदिरात दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी ७ वाजता घरी परतल्यावर मात्र दोघांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत त्यांनी एकूण ८० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे खडके यांनी तक्रारीत म्हटले आहे.