नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचा खर्च ५० कोटीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 05:40 PM2018-11-07T17:40:30+5:302018-11-07T17:42:35+5:30

महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. या कचऱ्यावर मनपाकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही.

The cost of destroying the garbage in Naregaon at 50 crores | नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचा खर्च ५० कोटीवर 

नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचा खर्च ५० कोटीवर 

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा करणार संशोधन सुसज्ज मैदानाचे स्वप्न

औरंगाबाद : महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. या कचऱ्यावर मनपाकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही. मागील नऊ महिन्यांपासून नारेगाव येथे कचरा टाकणे बंद आहे. मागील अनेक वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येईल, असे आश्वासन मनपाने खंडपीठाला यापूर्वीच दिले आहे. लाखो मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाला किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नारेगाव कचरा डेपोच्या जागेवर सुसज्ज मैदान उभारण्याचे स्वप्न मनपा प्रशासनाने बघितले आहे. सध्या पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया कशी करायची याचा अभ्यास करण्यासाठी खाजगी संस्थेच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात येईल. कचरा नष्ट करण्यासाठी निविदा काढण्याचा विचार मनपा प्रशासनाने सुरू केला आहे. नारेगाव येथे किमान २० ते २५ लाख मेट्रिक टन कचरा असावा, असा अंदाज आहे. यातील ६० टक्के कचऱ्याचे रूपांतर खत आणि मातीत झाले आहे. हा सर्व मिक्स पद्धतीचा कचरा असून, त्यात कॅरिबॅग, लोखंड, काच, ड्रेब्रीज वेस्टही 
आहे.

अनेक वर्षे हा कचरा असाच पडून राहिला तरी तो नष्ट होणार नाही. या संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करून प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर आहे. शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून जागेवरच कचरा नष्ट करता येऊ शकतो का, याचीही चाचपणी मनपा प्रशासन करीत आहे. नारेगाव कचरा डेपोप्रश्नी खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या असताना महापालिका प्रशासनाने एक वर्षात संपूर्ण जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले आहे.

या कचऱ्यावर लवकरच प्रक्रिया करायची असल्यास मनपाकडे आर्थिक तरतूद अजिबात नाही. यापूर्वी राज्याने मनपाला ९० कोटींचा निधी दिला. या निधीतून कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी कामे सुरू आहेत. जुन्या कचऱ्यासाठी मनपाला परत एकदा राज्य शासनाकडेच निधीची मागणी करावी लागणार आहे. 

Web Title: The cost of destroying the garbage in Naregaon at 50 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.