"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 07:15 PM2024-05-23T19:15:23+5:302024-05-23T19:17:06+5:30

Pune Accident News: पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून केली आहे.

Congress demands a judicial inquiry into the car accident in Pune and give severe punishment to the culprits    | "पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   

"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   

मुंबई - पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला असताना कार चालकाची अवघ्या १५ तासात सुटका होते हे अत्यंत गंभीर असून गरीब आणि श्रीमतांना वेगळे कायदे असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. कार चालक हा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याची सहज सुटका करण्याचा प्रकार झाला हे अत्यंत आक्षेपार्ह व सामान्यांना न्याय नाकारणारे आहे, पुण्यातील संपूर्ण घटनाक्रम पाहता पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुणेअपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पुणे शहरातील कल्याणीनगर भागात शनिवार दि. १९ मे २०२४ रोजी मध्यरात्री एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला, ही घटना अत्यंत गंभीर आहे. ही कार एक अल्पवयीन मुलगा बेदकारपणे चालवत होतो व मद्यपान करुन आलेला होता हे आतापर्यंतच्या माहितीवरून स्पष्ट झालेले आहे. घटना गंभीर असतानाही या प्रकरणात पुणे पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले आहे. कारचालक मुलगा वेदांत अग्रवाल याची वैद्यकीय तपासणी केली नाही, दोघांचा मृत्यू झाल्याची घटना असतानाही किरकोळ कलमे लावून तातडीने त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले व त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या आरोपीला जामीन देताना अत्यंत किरकोळ अटी घातल्या होत्या त्यात अपघात या विषयावर निबंध लिहण्यास सांगितले होते, हा हास्यास्पद व चीड आणणारे आहे. राज्यभरातील जनतेने तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर त्या मुलाला बालसुधारगृहात व त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

घटना गंभीर असतानाही १५ तासात आरोपीची सुटका होऊ शकते हे अनाकलनीय आहे. यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? ज्यामुळे आरोपी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरोपीची वैद्यकीय चाचणी का केली नाही? व तातडीने न्यायालयात हजर करून जामीन मिळावा याची तजवीज केली होती का? अपघातानंतर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये होता अशी माहिती समोर आली आहे. त्या आमदाराची या प्रकरणात नेमकी भूमिका काय? कारचालक मुलाच्या वडीलांचे कुख्यात माफियाशी संबंध असल्याचेही समजते, असा आऱोप नाना पटोले यांनी केला. 

तसेच राज्याचे गृहमंत्री अचानक पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाला भेट देतात व पत्रकारांना खुलासे करतात, एवढी तत्परता त्यांनी दाखवण्याचे कारण काय? ज्या बेकायदेशीर घटनांमध्ये भाजपाचा काही संबंध असतो वा इतर संबंध असतात त्या ठिकाणीच फडणवीस तातडीने जातात, हे संशयास्पद आहे. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजक्शनचा काळाबाजार करणाऱ्याला अटक केली असता ह्याच गृहस्थाने मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस कारवाईत हस्तक्षेप केला. परवा भाजपा उमेदवाराने पैसे वाटल्याचे प्रकरण झाले असता तेथेही हे गृहस्थ गेले होते, एरवी ते कोणतेच प्रकरण गांभिर्याने घेत नाहीत. मग याच प्रकरणात एवढी तत्परता का? या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री मात्र कुठेच दिसत नाहीत हेही आश्चर्याचे आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: Congress demands a judicial inquiry into the car accident in Pune and give severe punishment to the culprits   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.