Coronavirus: मुलांना कोरोनामुक्त ठेवण्याचा पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:48 IST2021-05-27T08:46:36+5:302021-05-27T08:48:16+5:30
Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनापासून मुलांचा बचाव करण्यासाठी मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणेने ठोस पावले उचलली आहेत.

Coronavirus: मुलांना कोरोनामुक्त ठेवण्याचा पॅटर्न
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यातच मराठवाड्यात गेल्या पाच महिन्यांत १८ वर्षांखालील ३० हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत मराठवाड्यात ३० हजार ३८८ मुले कोरोनाबाधित झाली आहेत, तर २६ मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनापासून मुलांचा बचाव करण्यासाठी मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणेने ठोस पावले उचलली आहेत.
पुढील लाटेमध्ये फक्त मुलांचे प्रमाण जास्त राहील अथवा फक्त मुलेच बाधित होतील असे नाही. कोरोना जसा मोठ्यांना होऊ शकतो तसाच व तेवढ्याच प्रमाणात तो मुलांनाही होऊ शकतो, फक्त मुलांमध्ये तीव्र आजाराची शक्यता कमी आहे. मुलांसाठी कोविडचे वाॅर्ड,
कोविडचे आयसीयू व इतर पूर्वतयारी महत्त्वाची ठरेल.
- डॉ. प्रशांत जाधव, बालरोग तज्ज्ञ
जालना
जिल्ह्यातील प्रत्येक कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी १५ ऑक्सिजन बेड राखून ठेवले आहेत. बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
औरंगाबाद
विविध रुग्णालयांत मुलांच्या उपचारासाठी ७३६ बेडचे नियोजन केले आहे. यात ४५ व्हेंटिलेटर आणि ४३७ ऑक्सिजन बेड राहणार आहेत. गरवारे कंपनीत १०० खाटांचे बाल कोविड रुग्णालय आणि एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये १०० खाटांचे कोविड सेंटर उभारले जात आहे. नव्या बालरोगतज्ज्ञांची नियुक्तीही आरोग्य विभागाने केली आहे.
लातूर
जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन केला आहे. शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, स्त्री रुग्णालय, उदगीर, निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि १२ ग्रामीण रुग्णालयांत अतिदक्षतेसह अन्य स्वतंत्र वॉर्ड केले आहेत. खासगी १५० डॉक्टरांना ५०० खाटा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले.
हिंगोली
जिल्हा रुग्णालयात ५० खाटांचा स्वतंत्र विभाग उभारण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी दहा खाटा लहान मुलांसाठी उपलब्ध होतील. त्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लहान मुलांसाठीची अपेक्षित सर्व औषधी आदींचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागही उघडण्यात येणार आहे.
उस्मानाबाद
जिल्हा रुग्णालयात ५० बेडचा स्वतंत्र कक्ष सुरू केला जात आहे. उस्मानाबादसह तुळजापूर, उमरगा, कळंब अशा प्रमुख शहरांत खासगी बाल रुग्णालयात बेड राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील प्रमुख बालरोग तज्ज्ञांनी आपल्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
बीड
मराठवाड्यात बाधीत मुलांची सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यात आहे. अंबाजोगाईच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संभाजी चाटे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नियुक्त करण्यात आला आहे.
परभणी
जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी ५० खाटांचा आयसीयू कक्ष तयार केला आहे. येत्या काही दिवसांत जि.प. कोविड रुग्णालयात ४०० खाटांचा बालरोग कक्ष सुरू केला जाणार आहे.
नांदेड
जिल्ह्यात ५०० खाटांची विशेष व्यवस्था शासकीय रुग्णालयात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २५० खाटांच्या तयारीसाठी १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच, टास्क फोर्सचीही स्थापना करण्यात आली आहे.
वयोगट ० ते १८
कालावधी : जानेवारी ते मे २०२१
जिल्हा बाधित मुले मृत्यू
औरंगाबाद ४,९८१ ०९
बीड ७,९८५ ०४
जालना ६८ ००
परभणी ४,३६६ ०३
नांदेड १०१ ०१
लातूर ७,६०३ ०२
हिंगोली १,१२६ ०३
उस्मानाबाद ४,१५८ ०४
एकूण ३०,३८८ २६
एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत
० ते १८ या वयोगटातील रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण (आकडे टक्क्यांत)
जिल्हा रुग्ण मृत्यू
औरंगाबाद ५.८३ ०.३२
बीड ९.८३ ०.२१
जालना ०.११ ००
परभणी ११.३० ०.५५
नांदेड ०४ ००
लातूर ८.६९ ०.००२
हिंगोली १०.४ ०.८९
उस्मानाबाद १०.४६ ०.७७