संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यात करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार (मेडिकल हब) आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. गेल्या १० वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या औषधी भांडाराच्या कामालाही गतवर्षी कोरोनाचा फटका बसला. आता कुठे त्याच्या उभारणीला गती मिळत आहे. आता औषधी भांडाराची उभारणी कधी पूर्ण होते आणि प्रत्यक्षात त्याचा वापर कधी सुरु होतो, याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औषधी भांडार आणि प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी शासन निर्णयाद्वारे ५ सप्टेंबर २०१९ रोजी ३० कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली. प्रत्यक्षात २०१० मध्येच औषधी भांडार उभारण्याचा निर्णय झाला होता. औषधी भांडारासाठी करमाड ग्रामपंचायतीने १३ एकर जमीन दिली. तेथे संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले. त्यानंतर आजघडीला इमारतीची उभारणी सुरु आहे. काही कॉलम उभे राहिले. काही प्रमाणात स्लॅबचे काम झाले.
पोलिओ व्हॅक्सीनच्या साठवणुकीसाठी उणे १५ ते २५ तापमान आवश्यक असते. त्या दृष्टीने औषधी भांडाराच्या इमारतीमध्ये पोलिओ व्हॅक्सीन स्टोअर राहणार आहे. अॅन्टी रेबीज सिरम, अॅन्टी रेबीज व्हॅक्सीनसह सर्व प्रकारच्या व्हॅक्सीनसाठी २ ते ८ तापमान लागते. त्यानुसार स्टोअर उभारण्यात येणार आहे. कोरोना लसी साठविण्यासाठी जागेची शोधाशोध करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली. त्यानंतर नवे कोल्ड स्टोअरेजही उभारले. औषधी भंडार यापूर्वीच उभारले गेले असते तर निश्चितच त्याचा अधिक फायदा झाला असता.
एका एकरात हेलिपॅड
पूर, भूकंप अशा आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा पुरवठा कमीत कमी वेळेत करणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने औषधी भांडाराच्या एका एकरमध्ये हेलिपॅड उभारण्याचे नियोजन आहे.
कामाचा आढावा घेणार
बांधकाम विभागामार्फत औषधी भांडाराची उभारणी केली जात आहे. कामाच्या प्रगतीचा लवकरच आढावा घेतला जाईल. नियोजित वेळेत औषधी भांडाराचे बांधकाम पूर्ण होईल. राज्यभरात औषधी पुरवठ्यासाठी त्याचा फायदा होईल. लसी साठवण्यासाठी छोटे-छोटे कोल्ड स्टाेअरेज ही गरजेचे असतात.
-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक,
----
फोटो ओळ..
करमाड येथे उभारण्यात येत असलेले राज्यस्तरीय औषधी भांडार.