पत्नीला सतत मारहाण, पैशांसाठी छळ; लाचखोर फौजदारावर कौटुंबिक छळाचा दुसरा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:48 IST2025-09-03T15:47:57+5:302025-09-03T15:48:32+5:30
लाचखोर फौजदारावर दीड वर्षात दुसरा गुन्हा

पत्नीला सतत मारहाण, पैशांसाठी छळ; लाचखोर फौजदारावर कौटुंबिक छळाचा दुसरा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : पत्नीला सतत मारहाण करून मुलीचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र किसन बहुरे (मूळ रा. बेंबळेची वाडी, पैठण) याच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुलै, २०२४ मध्ये प्रशिक्षण कालावधीतच रामचंद्रला धाराशिवमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
२६ वर्षीय विवाहितेने तक्रार दाखल केली. २०१६ मध्ये तिचा सिल्लोड येथे रामचंद्रसोबत विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी असून जवळपास सात वर्षे त्यांचा संसार सुखात गेला; पण नंतर रामचंद्रने पत्नीला मारहाण सुरू केली. माहेरी जाण्यावर निर्बंध घालत आई- वडिलांसोबत बोलण्यावर बंदी घातली. २०२३ मध्ये उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्यानंतर छळ वाढला. त्याची अधिकारी म्हणून पहिली नियुक्ती सातारा पोलिस ठाण्यात झाली. त्यानंतर त्याने पत्नी व मुलीला सांभाळण्यास नकार दिला. पत्नीच्या माहेरच्यांना १० लाखांच्या दागिन्यांची मागणी केली. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने जानेवारी, २०२४ मध्ये भरोसा सेल येथे तक्रार अर्ज दिला. कारवाईच्या भीतीने त्याने पत्नी व मुलीला सांभाळण्याचे आश्वासन देत अर्ज मागे घ्यायला लावला. मात्र, त्यानंतर पुन्हा पत्नी, मुलीला दूर केले. जुलै महिन्यात पत्नीने पुन्हा अर्ज दिला; पण तो सुनावणीलाच गैरहजर राहिला.
दीड वर्षात दुसरा गुन्हा
विशेष म्हणजे, जुलै, २०२४ मध्ये एका हॉटेलचालकाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्याने व हवालदाराने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तेव्हा एसीबीने त्यात त्याला रंगेहाथ पकडले होते. सध्या तो धाराशिव पोलिस मुख्यालयात नियुक्त आहे. सातारा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक निर्मला राख या करीत आहेत.