पोलिस ठाण्यातच घेतली पाच हजार रुपयांची लाच; हवालदार रंगेहात पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:10 IST2025-09-01T18:05:46+5:302025-09-01T18:10:01+5:30
ही कारवाई एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली.

पोलिस ठाण्यातच घेतली पाच हजार रुपयांची लाच; हवालदार रंगेहात पकडला
छत्रपती संभाजीनगर: तक्रारदारांविरोधात दाखल गुन्ह्याचा बी समरी अहवाल पाठविण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेताना एका पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी दुपारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली. हैदर अब्दुल खलील शेख (५४, बक्कल नंबर १०९४) असे अटकेतील लाचखोर हवालदाराचे नाव आहे. या कारवाईविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरोधात २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात कलम १२३ व३(५) भा.न्या.संहिता अन्वये गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मुंढे करीत होते.
उपनिरीक्षक मुंढे यांना भेटण्यासाठी तक्रारदार हे १४ ऑगस्ट रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे येथे गेले होते. तेव्हा हवालदार हैदर अब्दुल खलील शेखची भेट झाली. यानंतर हवालदार शेख यांनी गुन्हा बी फायनल करण्यासाठी लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २९ ऑगस्ट रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
३१ ऑगस्ट रोजी तक्रारदार हे सरकारी पंचासह उपनिरीक्षक मुंढे व हवालदार हैदर शेख यांच्याकडे पाठविण्यात आले असता मुंढे यांनी या गुन्ह्यासंबंधी तक्रारदार यांच्याकडे चौकशी केली मात्र लाचेची मागणी केली नाही. त्यानंतर तक्रारदार हे शेख यास भेटले असता त्याने तक्रारदार यांना गुन्ह्याची बी फायनल करण्यासाठी लाचेच्या २० हजारांपैकी तडजोडीअंती १० हजार रुपये यापूर्वी स्वीकारल्याचे मान्य केले. उर्वरित ५ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून हवालदार शेख हैदर यास रंगेहात पकडले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गजानन घायवट, पोलिस अंमलदार गजेंद्र भुतेकर, मनोहर भुतेकर, गजानन कांबळे, अशोक राऊत यांनी केली.