नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:33 IST2025-05-31T12:32:13+5:302025-05-31T12:33:15+5:30
जवाहरनगर पोलिसांवर पीडितेचा गंभीर आरोप; महिलांबाबत निष्काळजीपणाचा दुसऱ्यांदा प्रकार समोर

नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
छत्रपती संभाजीनगर : एका बड्या नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय पीडितेला जवाहरनगर पोलिसांनी तासभर ठाण्यात बसवून ठेवले. तर, तिला बेदम मारहाण करून जखमी केलेल्या आरोपींना अधिकाऱ्याच्या दालनात बसवून चहा पाजून सोडून दिल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे.
२४ वर्षीय पीडितेसोबत श्रीकांत तेजराव लहाने (३०, रा. भानुदासनगर) याने संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिला होता. त्यामुळे श्रीकांतवर छावणी ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा मागे घेण्यासाठी श्रीकांतने तिच्यासोबत १० नोव्हेंबर रोजी विद्यापीठ परिसरात लग्न केले. मात्र, घरी नांदवण्यास नकार देत हॉस्टेलवर ठेवले. २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता पीडितेने थेट श्रीकांतचे घर गाठले. त्याच्या कुटुंबाने मात्र तिला घरात घेण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत त्यांना ठाण्यात येण्याची सूचना केली. पीडिता रिक्षाने ठाण्यात जाताना भानुदासनगरजवळ तिची रिक्षा अडवून कल्याण तेजराव लहाने व अमृता अकोलकर हिने मारहाण करून गंभीर जखमी केले. स्थानिकांनी मध्यस्थी करत पीडितेची सुटका केली. पहाटे ३ वाजता अमृता व कल्याणवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला चहापाणी, पीडितेला हिडीसफिडीस
पीडितेने यासंदर्भात रात्रीतूनच शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांना कॉल करून मदत मागितली. त्यात तिने ठाण्यात पोलिसांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीचा धक्कादायक उलगडा केला. ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मला मारहाण करणाऱ्या आरोपींना दालनात नेऊन चहापाणी करून सोडून दिले. आरोपी माझ्यासमाेर हसत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पोलिस उपायुक्त, निरीक्षक ‘नॉट रिचेबल’
या घटनेबाबत बाजू समजून घेण्यासाठी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी प्रतिसाद दिला नाही. श्रीकांत हा एका बड्या नेत्याचा नातेवाईक असल्याचे पीडितेने सांगितले. विशेष म्हणजे, जवाहरनगर ठाण्यातील अधिकाऱ्यांनी यापूर्वीही एका बलात्कारातील अल्पवयीन पीडितेला अशीच वागणूक दिली होती.