शहर बदलण्यासाठी आलेले आयुक्त स्वत: बदलीच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:59 PM2019-06-02T23:59:12+5:302019-06-03T00:00:04+5:30

मागील १३ महिन्यांमध्ये आयुक्तांना शहरात बदल घडवून आणता आला नाही.

The commissioner who came to change the city was ready to replace himself | शहर बदलण्यासाठी आलेले आयुक्त स्वत: बदलीच्या तयारीत

शहर बदलण्यासाठी आलेले आयुक्त स्वत: बदलीच्या तयारीत

googlenewsNext
ठळक मुद्देआयुक्तांना दिल्लीत नेमणूक हवी आयुक्तपदी किरण गिते यांच्या नावाची चर्चाकचरा प्रश्नात किंचितही सुधारणा झालेली नाही.

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी मे २०१८ मध्ये दिल्लीहून खास डॉ. निपुण विनायक यांना औरंगाबादेत मनपा आयुक्त म्हणून आणण्यात आले. मागील १३ महिन्यांमध्ये आयुक्तांना शहरात बदल घडवून आणता आला नाही. कचरा प्रश्नात किंचितही सुधारणा झालेली नाही. आता आयुक्तच स्वत: बदलीच्या प्रयत्नात आहेत. त्यांना दिल्ली येथे नेमणूक हवी आहे. मागील चार दिवसांपासून आयुक्त मुंबई-दिल्ली दौऱ्यावर आहेत. लवकरच त्यांच्या बदलीचे आदेश मनपाला प्राप्त होतील. नवीन आयुक्त म्हणून किरण गिते यांच्या नावाची चर्चा आहे.

शहरात कचरा कोंडी, पाणी प्रश्न, मनपा दिवाळखोरीत निघालेली असताना शासनाने खास डॉ. निपुण विनायक यांना शहरात आणले. स्वच्छ भारत अभियानात काम केल्याचा त्यांना दांडगा अनुभव असून, ते शहराचा लूक बदलून टाकतील, असा विश्वासही शासनाने व्यक्त केला होता. मागील १३ महिन्यांमध्ये आयुक्तांना कचरा प्रश्न सोडविता आला नाही. पाणी प्रश्नात मार्ग काढता आला नाही. उलट पाणी प्रश्न अधिक जटिल करून ठेवण्यात आला. मनपाची दिवाळखोरी कमी होण्याऐवजी उलट वाढली आहे. कंत्राटदारांच्या कामांची बिले ३०० कोटींपर्यंत पोहोचली आहेत. प्रशासनावर आयुक्तांचा कोणताच वचक राहिलेला नाही. बीड बायपासला सर्व्हिस रोड तयार करण्याचे काम पोलीस आयुक्तांनी सुरू केले. त्यात खोडा घालण्याचे काम मनपाने केले. बायपासवर आठवड्यातून किमान दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.

मनपा आयुक्तांनी शहर बसचा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. याशिवाय त्यांचे कोणतेच उल्लेखनीय काम नाही. या शहरात बदल घडविणे अशक्यप्राय आहे, असे आयुक्तांना वाटायला लागले. मागील काही दिवसांपासून त्यांनी स्वत:च बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबा, असे शासनाने त्यांना सांगितले होते. आचारसंहिता संपताच पुन्हा आयुक्तांच्या हालचालींना वेग आला आहे. मागील चार दिवसांपासून ते सुट्टी टाकून मुंबई आणि दिल्ली दौऱ्यावर आहेत. शासनाने अलीकडेच त्यांना पदोन्नतीही दिली आहे. दिल्लीत सचिव म्हणून त्यांची काम करण्याची इच्छा आहे. लवकरच डॉ. निपुण विनायक यांच्या बदलीचे आदेश प्राप्त होतील, अशी चर्चा मनपा वर्तुळात आहे.

मराठवाड्याचे भूमिपुत्र
बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले तथा २००५ च्या बॅचचे आयएएस किरण गिते यांची मनपा आयुक्तपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी, जलस्वराज्य, पुण्याच्या पीएमआरडीए आदी ठिकाणी त्यांनी काम केले आहे. औरंगाबाद मनपा आयुक्तपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: The commissioner who came to change the city was ready to replace himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.