छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने वीज बचतीसाठी ७ वर्षांपूर्वी पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्याचे धोरण स्वीकारले. या धोरणानुसार शहरात ७० हजार पथदिवे लावण्यात आले. त्यामुळे विजेच्या बिलात दरमहा १ कोटींहून अधिकची बचत होऊ लागली. राज्यातील अन्य नगर परिषदा, जि. प. व सा. बां. विभागानेही अशाच पद्धतीचे धोरण स्वीकारले पाहिजे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे धोरण कौतुकास्पद असल्याचे नुकतेच पुण्यातील यशदा येथील प्रशिक्षण सत्रात तज्ज्ञांनी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर यशदा येथे आयोजित केले होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने घनकचऱ्यासह एलईडी पथदिव्यांचा प्रकल्पही प्रशिक्षणात सादर केला. कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी सादरीकरण केले. या योजनेचे फायदेही त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांसाठी पथदिवे लावण्याकरिता अमृत योजनेतून एलईडी दिव्यांची योजना आणली होती. या योजनेचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांना घेता आला नसल्याचे सांगण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने राबविलेल्या योजनेचे कौतुक करण्यात आले.