‘रोख नको, ऑनलाइन पाठव’ म्हणणाऱ्या लिपिकाला ‘फोन पे’वर लाच घेताच अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:42 IST2025-07-04T19:41:42+5:302025-07-04T19:42:13+5:30
मृत होमगार्डच्या उपचारांचे बिल देण्यासाठी लावला होता पैशांचा तगादा

‘रोख नको, ऑनलाइन पाठव’ म्हणणाऱ्या लिपिकाला ‘फोन पे’वर लाच घेताच अटक
छत्रपती संभाजीनगर : तीन वर्षांपूर्वी उपचारादरम्यान निधन झालेल्या होमगार्डच्या रुग्णालयाचे बिल व सानुग्रह अनुदानाची २ लाख ९७ हजार रुपये मंजूर करण्यासाठी २० हजारांची लाच मागणारा होमगार्ड कार्यालयाचा मुख्य लिपिक सोपान पंडित टेपले (४१, रा. मयूर पार्क) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. तक्रारदाराकडून त्याने ऑनलाइन फोन पेवर लाच स्वीकारली, हे विशेष.
२४ वर्षीय तरुणीचे ४९ वर्षीय वडील छत्रपती संभाजीनगर विभागात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. २०२३ मध्ये आजारामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे मुलीने वडिलांच्या उपचारांचे बिल व सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी एन-१२ येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, लाचखोर टेपलेने तिचा अर्ज अडवून ठेवला. उपचारांचे बिल व अन्य रक्कम मंजूर करण्यासाठी २० हजारांची लाच मागितली. वारंवार विनंती करूनही टेपलेने पैशांची मागणी कायम ठेवली. त्यामुळे संतप्त तरुणीने थेट याप्रकरणी एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. कांगणे यांच्या आदेशावरून निरीक्षक राजू नांगलोत, संतोष तिगोटे यांनी तक्रारीची खातरजमा केली.
रोख नको, ऑनलाइन पाठव
तपासात टेपले लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाच्या सूचनेवरून तरुणीने पुन्हा टेपलेला संपर्क साधला. टेपलेने तडजोडीअंती १५ हजारांची मागणी केली. मात्र, रोखऐवजी ऑनलाइन पैसे पाठवण्यास सांगितले. गुरुवारी तरुणीने त्याला १५ हजार रुपये ‘फोन पे’वर पाठवले. त्यावेळी नांगलोत, तिगोटे यांच्यासह अंमलदार राजेंद्र सिनकर, साईनाथ तोडकर, एन बागूल हे कार्यालयाबाहेरच दबा धरून बसलेले होते. टेपलेने तरुणीला पैसे प्राप्त झाल्याचे सांगताच पथकाने कार्यालयात जात त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.