आक्षेपार्ह वक्तव्यावरून हर्षनगरात दोन गटांत राडा; रात्रीतून दंगा काबू पथक तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:45 IST2025-07-19T12:43:42+5:302025-07-19T12:45:08+5:30
अल्पवयीन मुलांचा समावेश, लाठ्याकाठ्यांनी हल्ला, पाच जखमी

आक्षेपार्ह वक्तव्यावरून हर्षनगरात दोन गटांत राडा; रात्रीतून दंगा काबू पथक तैनात
छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावरून पायी जाणाऱ्या दोन युवकांना पाहून आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून युवकांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. शुक्रवारी रात्री आठ वाजता घडलेल्या घटनेत पाचजण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षनगर भागात दोन युवक पायी चालले होते. चौकात उभ्या काही युवकांनी या दोघांना उद्देशून खोडसाळपणे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यातून त्यांच्यात वाद उफाळून आले. काही क्षणांतच दुसऱ्या गटातील तरुण चौकात दाखल झाले. दोन्ही गट आमनेसामने आले. लाठ्याकाठ्या, दगडांनी एकमेकांवर हल्ला चढवला. दोन्ही गटांतील पाचजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, दिलीप चंदन, उपनिरीक्षक भागवत मुठाळ, अजित दगडखैर यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जमावाला पांगवत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सहायक आयुक्त संपत शिंदे, विशेष शाखेचे अविनाश आघाव, गुन्हे शाखेचे संभाजी पवार हेदेखील आले.
पोलिसांचे शांततेचे आवाहन
निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधून युवकांना समजावून सांगण्याची सूचना केली. शिवाय, शांततेचे आवाहन केले. रात्री उशिरा दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात बहुतांश युवक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरात दंगा काबू पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.