‘टीम औरंगाबाद’च्या माध्यमातून तयार होतोय शहराचा जाहीरनामा
By Admin | Updated: September 10, 2014 00:53 IST2014-09-10T00:37:09+5:302014-09-10T00:53:37+5:30
औरंगाबाद : आतापर्यंत आपण विविध पक्षांचा, उमेदवारांचा जाहीरनामा पाहिला आहे; परंतु ‘टीम औरंगाबाद’ बनविणार आहे

‘टीम औरंगाबाद’च्या माध्यमातून तयार होतोय शहराचा जाहीरनामा
औरंगाबाद : आतापर्यंत आपण विविध पक्षांचा, उमेदवारांचा जाहीरनामा पाहिला आहे; परंतु ‘टीम औरंगाबाद’ बनविणार आहे आपल्या औरंगाबादचा पहिला जाहीरनामा़ संपूर्ण औरंगाबाद शहरात सर्वेक्षण करण्यात येत असून ‘टीम औरंगाबाद’चे स्वयंसेवक ५० हजार नागरिकांना भेटणार आहेत़ येणाऱ्या पाच वर्षांत औरंगाबादवासीयांना आपले शहर कसे हवे आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे टीम औरंगाबादच्या वतीने सांगण्यात आले़
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली टीम औरंगाबादची स्थापना करण्यात आली़ विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजेंद्र दर्डा यांनी टीम औरंगाबाद ही संकल्पना मांडली आहे़ औरंगाबाद शहरातील विकासात सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढावा हाच या ‘टीम औरंगाबाद’चा मुख्य उद्देश असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले़
विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यासह समाजातील प्रत्येक घटकाने विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, शहरातील समस्यांना वाचा फोडावी, गैरप्रकारांना विरोध करावा आणि त्यासोबतच आपल्याकडील नावीन्यतम संकल्पना - सूचना सर्वांसमोर मांडव्यात हे टीम औरंगाबादच्या स्वयंसेवकांकडून अपेक्षित आहे़
टीम औरंगाबादच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ टीम औरंगाबादने आता संपूर्ण औरंगाबाद शहराचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे़ येणाऱ्या पाच वर्षांत औरंगाबादवासीयांना आपले शहर कसे हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी टीम औरंगाबादचे स्वयंसेवक शहरातील ५० हजार नागरिकांना भेटून प्रश्नावली भरून घेत आहेत़ या सर्वेक्षणातून पहिल्यांदाच औरंगाबादचा जाहीरनामा तयार होईल़ येणाऱ्या पाच वर्षांत औरंगाबादकरांना काय हवे आहे ते या जाहीरनाम्यातून स्पष्ट होणार आहे़ फेसबुकवरील ‘टीम औरंगाबाद’ हे पेज लाईक करून इच्छुकांनी टीम औरंगाबादच्या उपक्रमांना सर्मथन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़
ऐतिहासिक औरंगाबाद आता उद्योगनगरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे़ त्यामुळे या शहरात जेवढ्या संधी उपलब्ध होत आहेत, तेवढीच आव्हानेदेखील वाढली आहेत़ ही आव्हाने पेलण्यासाठी औरंगाबाद शहरात कोणते बदल अपेक्षित आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे़ याच उद्देशाने टीम औरंगाबाद हे सर्वेक्षण करीत असून औरंगाबादच्या उज्ज्वल भविष्याचा जाहीरनामा या उपक्रमातून तयार होत आहे़
-राजेंद्र दर्डा, (शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र)