बंदोबस्तात तंटामुक्ती अध्यक्षाची निवड
By Admin | Updated: September 10, 2014 00:47 IST2014-09-10T00:33:04+5:302014-09-10T00:47:42+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सांगवी घुग्गी या गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे़ त्यामुळे येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्यासाठी चुरस निर्माण झाल्याने लोकशाही शासनप्रणाली

बंदोबस्तात तंटामुक्ती अध्यक्षाची निवड
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सांगवी घुग्गी या गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे़ त्यामुळे येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्यासाठी चुरस निर्माण झाल्याने लोकशाही शासनप्रणाली गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करून पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात तंटामुक्त अध्यक्षाची निवड करण्यात आली़ या निवड प्रक्रियेत पहिल्यांदाच महिलांनी मोठयाप्रमाणात सहभाग नोंदविल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी हे तांडा वसाहत असलेले गु्रप ग्रामपंचायतीचे गाव असल्याने कोणत्याही निवडणुकीत चुरस होताना दिसून येते़ यामध्ये रविवारी झालेल्या तंटामुक्त अध्यक्षाच्या निवडीतही निवडणुकीप्रमाणे चुरस झाली होती़ एकंदर आठ उमेदवारांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होण्यासाठी आपले नामांकनपत्र सादर केले होते़ ताणतणाव वाढू नये यासाठी बंडूपंत मुंडे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता़ शिवाय, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी ग्रामसेवक शेख यांच्यावर घुग्गी सांगवी या गावातील निवडीची जबाबदारी होती़ विस्तार अधिकारी बालाजी पोतदार हे सुद्धा उपस्थित होते़ एकंदर चुरशीच्या निवडीसाठी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला़ यामुळे काही उमेदवारांनी आपले नामांकन वापस घेतले़ त्यामुळे विष्णुदास जाधव आणि प्रताप बिरादार यांच्यात लढत होऊन विष्णुदास जाधव यांना २४५ मते तर प्रताप बिराजदार यांना १७४ मते पडली़ (वार्ताहर)
महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत विष्णुदास जाधव यांनी २४५ मते घेऊन प्रताप बिरादार यांच्यापेक्षा आघाडी मिळविली़ त्यामुळे अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा गाव व परिसरात आहे़
४तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोनवेळा ग्रामसभा बोलावूनही तोडगा न निघाल्याने ग्रामसभा तहकूब झाली होती़ त्यामुळे रविवारी तिसऱ्यांदा ग्रामसभा घेऊन तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आल्याने या प्रक्रियेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़