चिकूचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:15 IST2018-12-03T20:15:18+5:302018-12-03T20:15:36+5:30
दुष्काळ झळा : पीक विम्यातूनही वगळले; पिशोर परिसरातील शेतकरी संकटात

चिकूचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी!
- मुबीन पटेल
पिशोर (जि. औरंगाबाद) : यंदा दुष्काळामुळे पिशोरसह परिसरात चिकू उत्पादनात मोठी घट झाली असून, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. शिवाय शासनाच्या फळबाग पीक विम्यामध्ये चिकू या पिकाचा समावेश न केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
कन्नड तालुक्यातील पिशोर परिसर चिकूचे आगार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या जुन्या बागा येथे तग धरून आहेत. आठवड्यातून चार दिवस येथे चिकूचा बाजार भरतो. यात नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, बुलडाणा तर आंध्र प्रदेशमधील निजामाबाद व एदलाबाद येथून व्यापारी येत असतात. पिशोर परिसरात मुख्यत्वेकरून कालीपत्ती (गावरान) आणि गोलपत्ती हे चिकूचे वाण जास्त प्रचलित असून, खाण्यास चविष्ट व गोड असल्याने मागणी जास्त आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे छोटी का होईना चिकूची बाग आहे. यामुळे दरवर्षी आर्थिक स्थिती थोडी मजबूत होण्यासाठी या बागा मोठा आधार आहेत. पिशोरसह दिगर, शफेपूर, रामनगर, खातखेडा, पळशी बु., पळशी खुर्द, कोळंबी, भारंबा, शाफियाबाद, भिलदरी, जवखेडा, मोहंद्री, वासडी, हस्ता, निंभोरा, पिंपरखेडा, नेवपूर, नागापूर, करंजखेडा, नाचनवेल आदी गावांतील शेतकºयांकडे चिकू बाग आहेत.
यावर्षी चांगले पर्जन्यमान होईल, या आशेवर बळीराजा होता. परंतु रबी हंगाम पिकांना फटका तर बसलाच सोबत चिकूच्या बागांनाही मोठी झळ बसली आहे. पाण्याअभावी फुलोरा न लागल्याने फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. परिणामी फक्त ३० ते ४० टक्के इतकेच उत्पादन झालेले आहे. गतवर्षी उत्पादन थोडे बरे होते; परंतु अनेक व्यापा-यांचे अंदाज चुकल्याने त्यांना तोटा सहन करावा लागला होता. यावर्षी मात्र व्यापारी ताकही फुंकून पीत असून, माल बघूनच बाग खरेदी करीत आहेत.
विम्यातून वगळले, दुष्काळी अनुदानही नाही
शासनाच्या फळबाग पीक विमा योजनेत चिकूचा समावेश न केल्याने शेतकरी हताश झाला असून, दुष्काळी अनुदानही मिळाले नाही. यामुळे परिसरात पाच हजारांच्या जवळपास चिकूच्या बागा असूनही कृषी विभागाने चिकूला डावलल्याने मोठी खंत असल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.