चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण; आता १४७ एकरवरील मालमत्तांचे होणार मूल्यांकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:05 IST2025-05-22T16:58:39+5:302025-05-22T17:05:01+5:30
१४७ एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण; आता १४७ एकरवरील मालमत्तांचे होणार मूल्यांकन
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाने ज्या गटांमध्ये भूसंपादन करायचे आहे, त्यावर सूचना-हरकती स्वीकारल्या आहेत. आता मालमत्तांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. आठ ते दहा दिवसांत हे काम सुरू होणार आहे.
चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या ९ हजार ३०० फूट आहे. मोठ्या विमानांसाठी धावपट्टीची लांबी किमान १२ हजार फूट असणे गरजेची आहे. धावपट्टी वाढविण्यासाठी १४७ एकर जमीन लागणार आहे. त्यासाठी चिकलठाणा, मुर्तुजापूर, मुकुंदवाडी या गावांतील मालमत्तांचे संपादन करण्यात येत आहे. भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ६६ कोटी ७८ लाखांचा निधीही प्राप्त झाला असून, १५२ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी कलम ११ (१) नुसार ५८ हेक्टरची भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली होती. त्यावर सूचना-हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली. आक्षेपांवरील निर्णय महिनाभरात घेतले जातील, असे राठोड यांनी सांगितले.
बाधित घरांचे मूल्य
विमानतळ विस्तारीकरणात काही नागरिकांच्या मालमत्ता बाधित होत आहेत. यामध्ये पक्की, कच्ची घरे, झोपड्यांचा समावेश आहे. काही झाडे, विहिरीसुद्धा आहेत. या सर्व मालमत्तेच्या मूल्यांकनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात येणार आहे.
‘महसूल’ची यंत्रणा वापरणार
मूल्यांकनासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून मनुष्यबळ मिळणे अपेक्षित होते. प्राधिकरणाकडून मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. त्यामुळे महसूल विभागाने तलाठी, मंडळाधिकारी यांची एक टीम याकामासाठी नियुक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बाँड पेपरवर मालमत्ता खरेदी, सातबारावर मूळ मालकाचे नाव असणे, क्षेत्र कमी असणे तर मालकी हक्क एकाकडे तर ताबा दुसऱ्यांचा अशी काही प्रकरणे समोर आल्याचे समजते.